सिंधुदुर्ग – सावंतवाडी –मळेवाड कुंभारवाडी येथील अनिल नामदेव मुळीक यांच्या घराशेजारील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने अखेर जेरबंद केले.
मळेवाड कुंभारवाडी येथील शेतकरी अनिल नामदेव मुळीक यांच्या घराशेजारी त्यांच्या स्वमालकीची विहीर आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने मुळीक यांच्या पाळीव कुत्र्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या विहिरीत कोसळला. कुत्रे जोरात भुंकू लागल्याने व रात्रीच्या वेळी विहिरीच्या पाण्यात काहीतरी पडल्याने मोठा आवाज आल्याने मुळीक यांनी बाहेर येऊन विहिरीत पाहिले असता विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठेना मुळीक यांनी विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती दिली. या वेळी मराठे यांनी तात्काळ वनपाल धुरी याना संपर्क करत बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती दिली. यानंतर वन कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पिंजरा घेवून उपस्थीत झाले.बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. घाबरलेल्या अवस्थेत असलेला बिबट्या पिंजऱ्यात जाईना.अखेर अथक परिश्रम केल्यानंतर वन विभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. गेले कित्येक दिवस या परिसरात बिबट्या ची वावर असल्याने भीतीचे वातावरण होते. मात्र आता बिबट्याला जेरबंद केल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले आहे. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी केली होती. यावेळी वन अधिकारी गजानन पानपट्टे, वनपाल सी व्हीं धुरी, वरक्षक गेजगे, राठोड, जाधव,
नाना कुंभार,बाळा कुंभार, कृष्णा कुंभार, प्रथम कुंभार, विनय कुंभार, गणेश कुंभार, विशाल कुंभार, चंद्रकांत मुळीक, भिवसेन मुळीक, गुरुनाथ मुळीक, सद्गुरु कुंभार, भागवत मुळीक, संदेश कुंभार, ज्ञानेश्वर मुळीक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.