सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले भरून वाहू लागलेत. काही ठिकाणी तर पुलावरून पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. 1 जूनपासून ते आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 766.45 मिली मीटर पाऊस झाला आहे.
मॉन्सूनच्या आगमनानंतर दोन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. परंतु सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात हा पाऊस कोसळत आहे.
गेल्या 24 तासात सांवतवाडी 117 मिली मीटर, वैभववाडी 136 मिली मीटर, कुडाळ 55 मिली मीटर, वेंगुर्ला 110 मिली मीटर, कणकवली 108 मिली मीटर, दोडामार्ग 105 मिली मीटर, देवगड 80 मिली मीटर, मालवण मध्ये 63 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. सांवतवाडी आणि वैभववाडी तालुक्याला तर पावसाने थैमान घातले. पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे.
अनेक भागातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. माणगाव खोऱ्यात जाणाऱ्या मार्गावरील नदीला पूर आल्याने येथील पूल काहीकाळ पाण्याखाली गेले होते. शेतमळ्यांमधून पाणी ओसंडून वाहत आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना जोरदार सुरवात झाली आहे.