शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर दुपारी तातडीची बैठक, मुख्यमंत्री पदाबाबत खल….   

0
70

आज (शनिवार) दुपारी १२ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांचा कल जाणून घेणार असून त्यानंतरच सेनेची पुढची दिशा ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी सेनेचे सर्व आमदार आग्रही असून आदित्य ठाकरे यांच्या नावाला पक्षातील जेष्ठ आमदारांनीही पाठिंबा दिला आहे.

निकालानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या भावी धोरणांची पुसटशी झलक दिली होती.  भाजपबरोबर जागावाटपाचे सूत्र आधीच ठरले होते. पण भाजपची अडचण समजून घ्या, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने कमी जागांचा प्रस्ताव मान्य केला. प्रत्येक वेळी भाजपच्या अडचणी समजून घेता येणार नाहीत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये शिवसेनेला निम्मा वाटा हवा, असे स्पष्ट केलं होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, असे विचारता ‘तुमच्या तोंडात साखर पडो’, अशी ‘मार्मिक’ टिप्पणी ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत नेमकं काय ठरत यावर शिवसेनेची सत्तेतील भूमिका काय हे समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here