महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापनेच्या घडामोडींचा वेग आला आहे. सरकारस्थापनेचा दावा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. दरम्यान आज शिवसेना नेते दिवाकर रावते यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली त्यामुळे चर्चाना एकच उधाण आले. मात्र राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्या द्यायला आलो असल्याचे रावते यांनी सांगितल्याने अनेक चर्चाना पूर्णविराम मिळाला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी सादर करतील आणि सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. यावेळी शिवसेनेची भूमिका मात्र काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यात सध्या भाजप १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, एमआयएम २, समाजवादी पार्टी २, प्रहार जनशक्ती पार्टी २, माकप १, जनसुराज्य शक्ती १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी १, महाराष्ट्र नवनिर्माण सेना १, राष्ट्रीय समाज पक्ष १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष १३ असे संख्याबळ असून शिवसेनेने आतापर्यंत ४ आमदारांचा पाठिंबा मिळवला असून, सेनेचे संख्याबळ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने ६० वर पोचले आहे.