पणजी: मळकर्णे, केपे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सिंधु प्रभू देसाई नायक, यांना शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल “वर्ष २०२० च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित होणार्या त्या राज्यातील सर्वांत युवा शिक्षिका आहेत. शिक्षक दिनी आज दि. ५ सप्टेंबर २०२० रोजी होणार्या आभासी (वर्चुअल) पुरस्कार सोहळ्यात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सदर पुरस्कार प्रदान करतील.
श्रीमती प्रभुदेसाई यांची शैक्षणिक वाटचाल उत्कृष्ट आहे. त्यांनी रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले व बी.एड. पदवी संपादन केली आहे. गोवा विद्यापीठातून त्यांना रसायनशास्त्रात सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. त्यांना शिक्षण क्षेत्रातील सुमारे १४ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालय, धेंपे महाविद्यालय व सरकारी महाविद्यालय, केपे अशा काही प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये विद्यादानाचे काम केले आहे. त्यांनी रसायनशास्त्रातील वरिष्ठ विषयतज्ज्ञ आणि बंगळुरूमधील बहुराष्ट्रीय शैक्षणिक सॉफ्टवेअर कंपनी पीअरसन एज्युकेशन लिमिटेडमध्ये इंग्रजी भाषेच्या समीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
गोवा सरकारतर्फे घेतल्या जाणार्या गोवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता व त्यांची सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, सांगे येथे रसायनशास्त्राची व्याख्याता म्हणून नेमणूक करण्यात आली होती. उच्च माध्यमिक विद्यालयातील सहा वर्षांपैकी, तीन शैक्षणिक वर्षांमध्ये रसायनशास्त्रात 100% निकाल मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये व्यापक संशोधन केलेले आहे आणि “करिअर मार्गदर्शन”, “महिला सबलीकरण” आणि “नेतृत्व” या विषयात संसाधन व्यक्ती म्हणून काम पाहिले आहे. त्यांना वर्ष २०१६ मध्ये, मळकर्णे केपे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून बढती देण्यात आली.
“पुढारी म्हणजे अशी व्यक्ती ज्याला मार्ग माहित असतो, जो मार्ग दाखवतो आणि त्या वाटेने वाटचाल करतो”, अशाच पद्धतीने, श्रीमती सिंधू यांनी शाळेमध्ये उल्लेखनीय असे बदल केले आहेत. या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा आणि अभ्यासानुवर्ती-उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा भागात शिकणार्या बहुतेक विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसे जिंकली आहेत. त्यांनी शाळेच्या पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत, आणि शाळेत डिजिटल लायब्ररी, हर्बल गार्डन, किचन गार्डन व सानुकूलित कंपोस्ट युनिटची स्थापना केली आहे. “शिकवणीच्या भिंती” तयार करण्यासाठी त्यांनी शाळेत ग्राफिटीची ओळख करून दिली, मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेवर, त्यांनी विशेष भर दिला. त्यांनी प्रभावीपणे ई-प्रशासन हाताळले. लॉकडाऊन दरम्यान शाळेने नवीन शैक्षणिक मॉडेलचा प्रस्ताव ठेवला व त्यादिशेने वाटचालही सुरू केली आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे, एनसीईआरटीने घेतलेले आहेत. सिंधु प्रभूदेसाई यांना पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून भारत सरकारतर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शालेय पुरस्कार दोन वेळा प्राप्त झालेले आहेत. आदरणीय माजी राज्यपाल, श्रीमती मृदुला सिन्हा, दक्षिण गोव्याचे माननीय माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर, राज्यसभेचे खासदार श्री. विनय तेंडुलकर, वीजमंत्री श्री. निलेश काब्राल, तालुका स्तरीय सुकाणू समिती, केपे, गोवा महिला शक्ती अभियान व शिक्षण संचालनालय, गोवा, अशा विविध मान्यवरांतर्फे व संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री.मनोहर पर्रीकर यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर, शाळा प्रमुख म्हणून त्यांचा प्रवास दाखविण्यात आला होता.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका, सिंधू प्रभू देसाई यांना “शिक्षक विकास परिषद” चा राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे. शिक्षण क्षेत्रामधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल महिला दिन २०२० या दिवशी, जेसीआयतर्फेही त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
जानेवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या लिडरशीप पाथवेज फॉर स्कूल इम्प्रूव्हमेंट या पहिल्या राष्ट्रीय परिषदेत शैक्षणिक प्रमुख म्हणून या मुख्याध्यापिकेची केस स्टडी सादर केली गेली होती. ही परिषद एनसीएसएल – एनआयईपीए या, भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या शाखेतर्फे आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण भारतातून निवडलेल्या 48 प्रमुखांपैकी एक असण्याचा त्यांना बहुमान मिळाला होता. त्यांनी गोवा राज्य आणि सरकारी माध्यमिक विद्यालय, मळकर्णे यांचे प्रतिनिधित्व केले होते आणि या शाळेला “शाळा उत्कृष्टता केंद्र” म्हणून घोषित करण्यात आले होते. २०१९ मध्ये एनआयईपीए, नवी दिल्ली आणि गोवा समग्र शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने आयोजित राज्य परिषदेसाठी आपली केस स्टडी सादर करण्यासाठी निवडल्या गेलेल्या त्या गोव्यातील एकमेव सरकारी शाळा प्रमुख होत्या.
त्यांचा “रोल ऑफ लीडर इन ट्रान्सफॉर्मिंग दि स्कूल” या विषयावरील शोध निबंध २०२० मध्ये एनसीईआरटी (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ऍड ट्रेनिंग), नवी दिल्लीतर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये सादर करण्यासाठी निवडला गेला होता. त्यांनी अनेक राज्यांत आणि राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये आणि परिषदांमध्ये भाग घेतला आहे आणि सादरीकरणही केले आहे.
त्या एक चांगल्या वक्ता आणि लेखिका आहेत. त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांत अनेक लेख लिहिले आहेत. कर्नाटक आणि गुजरात राज्य बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डासाठी त्यांनी रसायनशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रमही तयार केला आहे. त्यांनी रसायनशास्त्रामध्ये ऑडिओ व्हिज्युअल एड्सवर विस्तृत संशोधन केले आहे.
“मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद होत आहे. माझ्यासाठी हा एक जबरदस्त अनुभव आहे. टीम लीडर म्हणून माझ्या समर्पित प्रयत्नांचे देशभरातून कौतुक झाले, याचा मला आनंद आहे”, असे मुख्याध्यापिका प्रभुदेसाई म्हणाल्या. “हा पुरस्कार मी मळकर्णे गावच्या लोकांना समर्पित करत आहे ज्यात पालक, विद्यार्थी; एसएमसी सदस्य आणि सरकारी माध्यमिक विद्यालयाचे संपूर्ण पथक, यांच्या सहकार्यासाठी आणि शाळेच्या उन्नतीत नियोजित धोरणे यशस्वी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केलेल्या सर्वांचा यामध्ये समावेश आहे”, असेही त्या पुढे म्हणाल्या.