भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार निलंबित, सिंधुदुर्गच्या वनखात्यात खळबळ आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी केली होती तक्रार

0
177

 

कणकवली – तालुका वनविभागातील भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांना उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी निलंबित केले आहे. बोगस पास विक्री यासह अनेक तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत सुतार हे दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात पुरावे गोळा करत तक्रार केली होती.

भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांच्याबाबत बोगस पास विक्री यासह अनेक तक्रारी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे दाखल झाल्या होत्या. माहिती अधिकारात माहिती मिळवत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी याबाबत रीतसर तक्रार दाखल केली होती. सत्यवान सुतार यांनी दिलेला पास हा वाहन क्षमतेपेक्षा तिप्पट क्षमतेचा होता, तसेच संबंधित पासवर लाकूड सामान वाहतूक करणाऱ्या वाहना ऐवजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा फोटो लावला होता. ही बाब विवेक ताम्हणकर यांनी पुराव्यानिशी उघड केली होती.

सत्यवान सुतार हे यापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असताना अवैध वृक्षतोड प्रकरणी निलंबित झाले होते. सुतार यांच्या बाबत स्थानिक शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी होती. सुतार यांच्या अवैध व नियमबाह्य कृतीमुळे कणकवली वनविभाग चर्चेत आला होता. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूडतोड आणि पाच विक्री प्रकरणाची देखील चर्चा होत होती. सत्यवान सुतार यांच्या निलंबनामुळे बनावट वाहतूक पाच विक्री प्रकरणाला यापुढे आळा बसेल असे मत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान निलंबनानंतर सुतार यांना वनक्षेत्रपाल कार्यालय दोडामार्ग येथे निलंबन कालावधीत मुख्यालय देण्यात आले आहे. दरम्यान शासकीय नियमानुसार त्यांना जिल्ह्याबाहेर मुख्यालय देणे आवश्यक असून याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here