न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया मृत्यू प्रकरणात काही नवीन पुरावे आणि तक्रारी आल्यास या प्रकरणाची फेरचौकशी करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी येथे दिली. त्यामुळे लोया प्रकरणाची नस्ती पुन्हा उघडण्याचे संकेत देत महाविकास आघाडी सरकारने भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सीबीआय न्यायाधीश लोया यांचा डिसेंबर २०१४ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि गुजरातमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप असलेल्या सोहराबुद्दीन चकमक खटल्याची सुनावणी लोया यांच्यापुढे सुरू होती. न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी विनंती करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. त्या सर्व फेटाळण्यात आल्या. मात्र राज्यात सत्तांतरानंतर न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकणावरून पुन्हा राजकारण पेटण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची नस्ती पुन्हा उघडण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. ‘या प्रकरणाबाबत भेटीसाठी मला अनेकांचे फोन आले होते. त्यांच्याशी चर्चा करून तसेच सविस्तर माहिती घेऊन या प्रकरणाची फेरचौकशी करायची की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल,’ अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.
कोरेगाव-भीमाप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. अधिकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच मी याप्रकरणी भूमिका मांडेन, असेही देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, ‘जेएनयू’ हल्ल्याच्या निषेधार्थ ‘फ्री काश्मीर’चा फलक झळकवणाऱ्या मेहक मिर्झा प्रभू या तरुणीवरील गुन्ह्य़ाबाबत चौकशी सुरू आहे. पूर्ण चौकशीअंतीच तिच्यावरील गुन्ह्य़ाबाबत निर्णय घेणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.