उष्णतेची लाट आणि होरपळणारा कोकणातील काजू व आंबा

0
124

 

सध्या कोकणात पारा ३६ अंश सेल्सिअसवर पोचला आहे. याचा मोठा फटका कोकणातील हापूसला बसला आहे. सुरवातीला हापूसला आलेला आलेला मोहोर सर्वानाच सुखावून गेला होता. कोरोनाच्या संकटानंतर या वर्षी सर्वानीच मोकळा श्वास घेतला असताना हापूसची चांगले उतपन्न देईल अशी सर्वाना अपेक्षा होती. परंतु वाढत जाणारी उष्णता या पिकाच्या मुळावर आली आहे. अजून बराच हंगाम जायचा आहे त्यात संकटे काही पाठ सोडत नाहीत. विशेष म्हणजे या संकटाचा फटका काजू पिकालाही बसला आहे.

कडकडीत उन्हामुळे कोकण वासीय कासावीस झाले असून आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या वातावरणाचा परिणाम हापूसवर झाला असून आंबा भाजून गळू लागला आहे. त्यात साका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर बारीक कैरी पिवळी पडून गळू लागली आहे. दिवसा कडकडीत उन्हासह उष्म्यांच्या झळांनी कोकण वासीय त्रस्त झाले आहेत. तीच परिस्थिती रात्रीच्यावेळीही आहे. गतवर्षी याच कालावधीत पारा ३२ अंशांपर्यंत होता. दरम्यान यंदाचा एप्रिल महिना चांगलाच कडकडीत जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

आंबापिकाचे उत्पादन हे प्रामुख्याने पावसाळा संपल्यानंतर अनुकूल असणाऱ्या हवामानावर अवलंबून असते. यंदा मात्र पिकासाठी सुरवातीचा थोडा काळ सोडला तर अनुकूल हवामान तयार झालेच नाही. यंदा पावसाळा अखेरपर्यंत होता, त्यामुळे मातीतला ओलावा कायम राहिला. ऑक्टोबर महिन्यात फारशी उष्णता जाणवली नाही. नोव्हेंबर महिन्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली. त्यावेळी आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. अचानक वातावरणात उष्णता वाढली आणि त्यानंतर पुन्हा थंडी पडली त्यामुळे झाडांना दुबार मोहोर आला. या दरम्यान पहिल्या मोहोराची फळे गाळून गेली. हवामानाचा लहरीपणा सुरूच राहिला. फेब्रुवारी- मार्च महिन्यातही ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाच्या सरी सुरूच राहिल्या. मार्च महिन्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सीअसवर जाऊन पोहोचला. त्यामुळे बागायतदार चांगलेच अडचणीत आले.

संपूर्ण हंगामात आंब्यापुढे हवामानाची एकामागोमाग एक संकटे येताहेत. यामुळे आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने आंबा पिकासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना लागू केली असली तरी ती कुचकामी ठरत असल्याचा अनुभव बागायतदारांना सातत्याने येत आहे. त्यामुळे पीक विमा योजनेला कोकणातून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

कोकणात फळ पिकाचा हंगाम सुरु झाल्यापासून अवकाळी, ढगाळ वातावरण याचा आजही कायम प्रभाव राहिला आहे. त्यामुळे यंदा आतापर्यंत २५ टक्केच उत्पादन बागायतदारांच्या हाती आले आहे. जे आंबा फळपिकाच्या बाबतीत झाले तेच आता काजूच्या बाबतीत होताना पहायला मिळत आहे. काजूला सुरवातीच्या टप्प्यात आलेला मोहर वाया गेला आहे तर आता उशिराने आलेल्या मोहरातून उत्पादन मिळण्यास सुरवात झाली आहे. मात्र, यामधूनही ३० टक्केच उत्पादन मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ढगाळ वातावरणामुळे काजू बी वर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बीचा दर्जा घसरला आहे. अनेक ठिकाणी तर बीचा गरच तयार झाला नाही. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे आता काजूचे बोंडू तयार होण्यापूर्वीच बी सुकलेली दिसत आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम हा काजू उत्पादनावर झालेला असल्याचे दिसून येते.

दरवर्षी काजूचे उत्पादन हे तीन महिने मिळते. पण यंदा हंगामाच्या सुरवातीचा मोहर तर वायाच गेला. त्यामुळे उशिरा आलेल्या मोहरातूनच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. उत्पादनात तर घट झालीच आहे शिवाय यंदा केवळ दोनच महिने हंगाम सुरु राहणार असल्याचे संकेत आहेत. कोकणात यंदा आंबा, काजू या मुख्य पिकांवरच परिणाम झाला असून अर्थकारणही बिघडणार आहे. यातच पहिल्या बहरातील काजू संपला असून शेतकऱ्यांना दुसऱ्या बहराची प्रतिक्षा लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here