आम्ही तिघे एकत्र, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करणार -शरद पवार

0
145

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. मात्र आम्हाला विश्वास आहे की, त्यांना ते करता येणार नाही. ते स्पष्ट झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्ष खबरदारी घेवू आणि ती घेतली जाईल असे सांगतानाच आम्ही तिघे एकत्र राहू… आहोत…आणि राहणार… कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जाणार असा विश्वास शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

अजितदादा पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.

यावेळी शरद पवार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या बद्दल पक्षाच्या बैठकीत निर्णय घेवून कारवाई करण्याचे संकेत यावेळी शरद पवार यांनी दिलेच शिवाय पक्ष सोडून गेलेल्या सदस्यांना पक्षांतर कायदा बंदीबाबत माहितीही दिली.

महाराष्ट्रात राज्य सरकार बनवण्यासाठी कॉंग्रेसचे शिवसेना राष्ट्रवादी तिन्ही पक्षांचे नेत्यांनी बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती. आमच्याकडे बहुमताची आकडेवारीसुध्दा होती, शिवसेना ५६ राष्ट्रवादी ५४ कॉंग्रेसचे ४४ असे आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले आणि आम्हाला व कॉंग्रेसला पाठिंबा दिलेल्यांची संख्या १६९ वर जात होती. यासंदर्भात काल आमची बैठक झाली. चर्चा झाली.मात्र
सकाळी पावणे सात वाजता आमच्या सहकार्‍याने टेलिफोन करुन सांगितले की, आम्हाला राजभवन येथे आणले आहे. मला राज्यपाल सर्व कार्यक्रम सोडून तयार आहेत याचे आश्चर्य वाटले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही सदस्य गेले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी घेतला असल्याचे शरद पवार म्हणाले.

हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरणाच्या विरोधात आहे. हा शिस्तभंगाचा निर्णय होता.आमचा प्रामाणिक कार्यकर्ता जाणार नाही. जे सदस्य गेले त्यांना पुर्ण माहिती असावी. जे गेले आणि जाणार असतील तर त्यांना पक्षांतर बंदीचा कायदा आहे. याची कल्पना आहे. त्याचं सदस्यत्व रद्द होतं त्याहीपेक्षा महाराष्ट्रात सक्त विरोध असताना हा निर्णय घेतला आहे तर मतदार त्यांना पाठिंबा देणार नाही. सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर तिन्ही पक्ष त्या व्यक्तीचा पराभव कसा करायचा याची काळजी घेतली जाईल असेही शरद पवार म्हणाले.

१० ते ११ सदस्य गेले आहेत. हा प्रकार घडल्यावर सदस्यांनी संपर्क साधला आहे.त्यामध्ये राजेंद्र शिंगणे यांनी संपर्क केला. त्यांना याची कल्पना होती का याबाबत त्यांच्या तोंडूनच ऐका असे पवार म्हणाले. यावेळी शिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील आमदार
राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादा पवार यांचा मला फोन आला. धनंजय मुंडे यांच्या B4 चा मेसेज आला. ८ ते १० आमदार आले. आम्हाला चर्चेला नेण्यात आले. आल्यानंतर राजभवनात नेण्यात आले. आम्हाला कुणालाही थांगपत्ता नव्हता. नंतर देवेंद्र फडणवीस आले. ताबडतोबीने शपथविधी झाला. आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांची शपथविधी झाली. त्यानंतर मी पवारसाहेब यांच्याकडे गेलो. आपल्या नेत्याचा फोन आला म्हणून गेलो अशी स्पष्ट माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनिल भुसारा यांनीही तीच माहिती पत्रकार परिषदेत दिली.

याशिवाय आणखी सदस्य आहेत. संपर्क साधला आहे. आम्ही पक्षाच्या सदस्यांचा सहया घेवून ठेवल्या होत्या. आम्ही यादी तयार केली होती. त्यापैकी एक यादी अजित पवार यांनी राज्यपालांकडे पाठवली असावी असा अंदाज आहे. त्या सहया अंतर्गत कामासाठी घेतल्या होत्या. पाठिंब्यासाठी नव्हत्या. त्यांना ५४ आमदारांच्या सहया आहेत असे भासवले असावेत असेही शरद पवार म्हणाले.

कॉंग्रेसची बैठक आहे म्हणून कॉंग्रेसचे नेते गेले आहेत. आमची विधीमंडळ नेता निवड आज ४ वाजता होणार आहे अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.

या सर्व गोष्टींचा पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. नक्की कारवाई होईल असेही शरद पवार म्हणाले.

१९८० साली माझे आमदार ६ शिल्लक राहिले होते त्यानंतर सर्वांचा पराभव केला आहे. त्यामुळे कुटुंब वेगळं आणि पक्ष वेगळा आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

गैरसमजातून कोण गेलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही परंतु जाणूनबुजून गेले असतील तर नक्की कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत दिले.

उध्दव ठाकरे-

पवारसाहेबांनी चित्र स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात हा खेळ सुरु आहे तो लाजिरवाणा आहे. नवं हिंदुत्व दाखवलं जात आहे.ते हिंदुत्व नाही. ईव्हीएमचा खेळखंडोबा पुरला नाही म्हणून हा रात्रीस खेळ चालेचा खेळ सुरू केला आहे.

मी पुन्हा येईन ऐवजी मी जाणारच नाही हेच त्यांना दाखवायचे आहे अशी जोरदार टिकाही उध्दव ठाकरे यांनी केली.

यांचा रात्रीस खेळ चाले आहे आमचं जे काही आहे ते उघड उघड आहे आणि करतो. हरियाणात, बिहार झाले. हा जनादेशाचा आदर आहे का. मी आणि मीच या मी पणाविरोधात लढाई सुरु झाली आहे. कुणी पाठीत वार करु नये असा इशाराही उध्दव ठाकरे यांनी दिला.

पवारसाहेब म्हणाले त्याप्रमाणे एकत्र आलो आहोत. एक आहोत आणि राहणार आहे असेही स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडली.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक,आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार सुप्रियाताई सुळे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अनिल देसाई, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here