सिंधुदुर्गात आतापर्यंत पाच हजार चाकरमानी दाखल पुणे मुंबईतून आलेत लोक

0
145

 

सिंधुदुर्ग – जिल्हय़ात आतापर्यंत 5 हजार 396 व्यक्ती जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत. जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांमधील गरोदर माता, वृद्ध व अपंग यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

सध्या जिल्हय़ामध्ये मुंबई, पुणे व अन्य जिल्हय़ातील बाधित क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. या प्रवाशांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता, पाच वर्षांखालील मुले व त्यांच्या माता, 60 वर्षांवरील वृद्ध, अपंग व दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने अशा व्यक्तींची तपासणी करून अटी व शर्तींच्या अधीन राहून 28 दिवस गृह अलगीकरणात ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

देवगड तालुक्यातील वाडा येथील कंटेनमेंट झोनमधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तीन किलोमीटरच्या या कंटेनमेंट झोनमध्ये वाडा, नाडण आणि पुरळ या गावांचा समावेश होता. 19 पथकांनी 822 घरांमधील 945 कुटुंबातील एकूण 3 हजार 697 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. या तपासणी सर्वेक्षणामध्ये एकही व्यक्ती बाधित झाली नसल्याचे दिसून आले. तसेच देवगड तालुक्यात वाडा येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

जिल्हय़ात 5,396 व्यक्ती दाखल

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात 13 मे 2020 रोजी 1 हजार 245 व्यक्ती दाखल झाल्या असून 14 मे रोजी अखेर जिल्हय़ात एकूण 5 हजार 396 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्हय़ातून बाहेर जाण्यासाठी गुरुवारी जिल्हा प्रशासनातर्फे 321 पास देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here