सिंधुदुर्गतील तांबळडेग किनारपट्टी खचली, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

0
180

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात उधाणाच्या भरतीमुळे समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. देवगड तालुक्याकतील तांबळडेग येथील किनाऱ्याला समुद्राच्या लाटांचा तडाखा बसत असून किनारपट्टी खचली आहे. किनाऱ्यालगतची झाडे समुद्राच्या लाटांमुळे उन्मळून पडत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसापासून पावसाने जिल्ह्याच्या किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस कोसळत आहे. पावसाच्या दमदार सरींमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला दिसत आहे. वाळूच्या किनाऱ्यावर लाटा धडकत असल्याने किनाऱ्याची धूप होऊ नये म्हणून किनारपट्टीला लावलेली सुरूची झाडे उन्मळून पडत आहेत. काही झाडे समुद्राच्या पाण्यात पडली आहेत. या भागात किनाऱ्यावरून रस्ता असून जवळच लोकवस्ती आहे. त्यामुळे समुद्राच्या लाटांचा तडाखा असाच कायम राहिल्यास धोका उद्‌भवण्याच्या शक्ययतेने नागरिकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. किनारपट्टी भागात संरक्षक भिंत व्हावी अशी स्थानिकांची मागणी आहे. रविवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. गेआतापर्यंत देवगड तालुक्यात २५०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. गेल्या दोन दिवसात कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले यांना पूर आला आहे.

किनारी भागातील मालवण तालुक्यातल्या आचरा काझी वाडी येथील अब्दुल हमीद शफिद्दीन काझी हे कुटूंबासह पहाटे घरात झोपले असताना घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले. यात काझी यांच्या पत्नीच्या पायावर सिमेंट पत्र्याचा तुकडा पडुन किरकोळ दुखापत झाली. तर सावंतवाडी मोती तलावाच्या काठी असलेले अशोक वृक्षाचे मोठे झाड कारवर पडून कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here