महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेची मोहीम सुरु असताना शिवसेना भाजपने आता शाब्दिक युद्धाला सुरवात केली आहे. भाजपाचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेच्या ५६ पैकी ४५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काकडे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे शिवसेना भाजपाकडून सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आपल्याला देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. परंतु संजय काकडे यांनी केलेल्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील खळबळजनक दावा केला आहे. भाजपाचे ५० आमदार आमच्या संपर्कात असून ते आपल्याला शिवसेनेत घेण्याची मागणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता यावर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.