सिंधुदुर्ग – जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आल्याने २१ जून पासून कोरोनाविषयक काही निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र, वर्षा पर्यटन धबधबे व अन्य पर्यटन स्थळे अजूनही पर्यटकांसाठी खुली झालेली नाहीत असे असतानाही काही हौशी पर्यटकांनी रविवारी ‘विक एन्ड ‘ सेलिब्रेशन करण्यासाठी आंबोली वर्षा पर्यटनाला आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यामुळे त्यांना नाईलाजाने माघारी फिरावे लागले. तर दहा पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची संख्या घटल्याने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल करून अनलॉक प्रक्रिया सुरु केल्याने पर्यटकांना आता आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचे वेध लागले आहेत. मात्र, सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन बंद आहे. सोमवार २१ जून पासून काही निर्बंध शिथिल होत असले तरीही पर्यटनाला परवानगी देण्यात आलेली नाही. पर्यटकांना याची कल्पना नसल्याने तसेच माहिती असूनही काही अतिउत्साही पर्यटक विकेंड सेलिब्रिशनसाठी रविवारी आंबोलीत दाखल झाले.
मात्र, कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर प्राशासनाचा ‘हाय अलर्ट’ असल्याने आंबोलीत सध्या पर्यटन बंदी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असल्यामुळे या पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडलं. पोलिसांनी अटक केल्यामुळे पर्यटकांना आल्या पावली माघारी वळावं लागलं. पर्यटन सुरू करण्याबाबत प्रशासनाचे अद्याप कोणतेही आदेश प्राप्त नसल्याने पर्यटकांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याने पोलिसांनी काही पर्यटकांना माघारी पाठवल तर अतिउत्साही १० पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. याबाबतची माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. एन. तेली यांनी दिली.काही पर्यटकांनी कोरोनाचे नियम पाळले नव्हते. त्यांच्या तोंडावर मास्क नव्हते त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पर्यटकांनी शासनाला सहकार्य कराव असं आवाहनही यावेळी पोलिसांनी केलं.