रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असताना खेड मधील अल्सुरे गावातील, दापोली मधील माटवण गावातील, अशा दोघांच्या मृत्यूनंतर आता गुहागर तालुक्यातील जामसुत येथील कोरोनाचा तिसरा बळी नोंदविला गेला आहे. बळी गेलेला रुग्ण 56 वर्षीय असून त्याला लिव्हरचा दुर्धर आजार होता. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण गुहागर तालुक्यात मिळून आल्याने खळबळ माजली होती. यानंतर तालुका सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणा राबविल्याने आज पर्यंत गुहागर तालुका सुरक्षीत होता. परंतु मुंबईवरून आलेल्या दोघांचे रिपोर्ट कोरोना बाधित निघाल्याने गुहागर पुन्हा ढवळून निघाले आहे. या दोघांमधील एकाचा रविवारीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर तो पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला तर मयताचा केअरटेकर म्हणून कायम बरोबर असलेला 50 वर्षीय व्यक्तीचाही कोरोना चा पॉझिटिव रिपोर्ट आला असल्याचे समजताच गुहागर तालुक्याच्या प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
गुहागर तालुक्याने तब्बल 56 दिवसानंतर कोरोना पॉझिटिव्ह खाते उघडले आहे. जामसुत येथील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव आल्याचे समजतात प्रशासनाची एकच धावपळ उडाली. जामसुत गाव तीन किलोमीटर परिसर आयसॉलेट करून मंगळवारी सकाळी जामसुत गावात तातडीने सर्वे करून दहा जणांना स्वाब तपासणीकरिता ताब्यात घेतले आहे. यामध्ये सरपंच, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, रुग्णाला गुहागरमध्ये घेऊन येणारा वाहन चालक, मयत रुग्णाची मुले यांचा समावेश आहे यानंतर या दहा जणांच्या संपर्कात आलेल्या 37 जणांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. रुग्णावर उपचार करण्याकरिता वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी कॉलेज किंवा एमटीडीसी निवास कोविड सेंटर म्हणून जाहीर केले जाणार आहे. गुहागर तालुक्यात मुंबई, पुणे व इतर भागातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे यापुढील परिस्थिती अति गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.