मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाला उपस्थिती लावत आज देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री आज कोकण दौऱ्यातील या मोठ्या उत्सवात नाणार प्रकल्पा विषयी काही भाष्य करतील, अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले. संपूर्ण कोकण दोऱ्यातही मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत यामुळे कोकण वाशीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान मंत्री सुभाष देसाई यांनी नाणारला शिवसेनेचा विरोधच असल्याचे म्हटले आहे. आजच्या दौऱ्यात नाणार रिफायनरी समर्थक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. सुभाष देसाई यांनी शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत आमचा रिफायनरीला विरोध असल्याचे सांगितले.
देसाई यांच्यासोबत सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनीही नाणार प्रकल्पाला शिवसेचा विरोध असल्याचे म्हटले आहे. सामना मध्ये नाणार रिफायनरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानं प्रकल्प समर्थकांना एक प्रकारे बळ मिळाल्याचं बोललं जात होतं. मात्र, राऊत यांनी जाहिरातीसंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि शिवसेनेची प्रकल्पविरोधी भूमिका या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. प्रकल्प नकोच अशी शिवसेनेची भूमिका आहे, असं ते म्हणाले आहेत.