सिंधुदुर्ग – संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर शुक्रवारी आ. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरण येत जामिनासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार असून यावेळी नितेश राणे यांना अटक होते की दिलासा मिळतो हे ठरणार आहे.
आ. नितेश राणेंच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी मुंबईतील ख्यातनाम वकील सतीश मानशिंदें सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. जिल्हा न्यायालयात त्यासोबत ऍड. संग्राम देसाई, ऍड. राजेंद्र रावराणे, ऍड. उमेश सावंत, ऍड. राजेश परुळेकर युक्तिवाद करणार आहेत. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर बी रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत न्यायालयाने याबाबत सोमवारी ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आ. राणे यांना अटक होणार की नाही ? याबाबत आज चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.