सिंधुदुर्ग – जिओने सावंतवाडी शहरात खोदलेले खड्डे,काही वार्डात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचा प्रश्न आदी अनेक विषयावर आज येथे आयोजित करण्यात आलेली पालिका सभा वादळी ठरली.
यावेळी विरोधी गटाच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी त्यांना जोरदार विरोध केला. मात्र त्याच ताकदीने नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचा विरोध मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. सावंतवाडी पालिकेची मासिक सभा आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेच्या सुरुवातीला शहरातील अंतर्गत भागात काही लोक कचरा रस्त्यावर टाकत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी नगरसेवक नासिर शेख यांनी केली. याला सर्वानीच अनुमोदन देत आवश्यक ठीकाणी सिसीटीव्ही बसवा तसेच नागरीकांना वारंवार सुचना देवून सुध्दा दखल घेतली जात नाही.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. यावेळी डॉ जयेद्र परुळेकर यांनी कारवाईची भूमिका योग्य आहे. परंतू कचर्याचे योग्य विलगीकरण करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस द्या,अशी मागणी केली.त्यानंतर आलेल्या रस्ते खोदाईच्या विषयात नगराध्यक्ष परब यांनी लोबोंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
आपण जीओचा ठराव पालिकेतच घेतला होता त्यात तुम्ही होता मग आता माहीत नाही असे पत्रकार परिषदेत कसे काय जाहीर केले? असा सवाल केला. यावेळी तुम्ही ठराव घेतला,तेव्हा आम्हाला विश्वासात घेतले.परंतू त्यानंतर रस्ते खोदाई करताना मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष या दोघांनी बसून निर्णय घेतला.
असे आपण बोलले. माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका, असे लोबो यांनी सांगितले.त्यानंतर झालेल्या चर्चेत शहरातील काही भागात पाणी मुबलक मिळत नाही.त्यामुळे ते नेमके मुरतय कुठे याची माहीती घ्या,अशी मागणी लोबो,बांदेकर व परुळेकर यांनी केली.
यावेळी पाणी पुरवठा सुरळीत आहे. मात्र पाईपलाईनची क्षमता कमी झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण होत आहे.तरीही नागरीकांच्या तक्रारी असतील तर आम्ही दखल घेवू, असे पाणी पुरवठा सभापती सुधीर आडीवरेकर यांनी सांगितले. त्याला शेख आणि नाईकांनी अनुमोदन दिले.