क्यार, महाचक्रीवादळ व अवेळी पावसामुळे शेती पिकांची हानी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱयांसाठी तिसऱया टप्प्यातील 3 कोटी 80 लाख 50 हजाराची रक्कम प्राप्त झाली आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात 61 हजार 528 शेतकऱयांसाठी 24 कोटी 99 लाख 8 हजाराचा निधी प्राप्त झाली आहे. 86.52 टक्के शेतकऱयांना बँक खात्यात मदत वितरणही सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
ऑक्टोबर, नोव्हेंबर 2019 या दोन महिन्याच्या कालावधीत ऐन भातकापणीच्या हंगामातच ‘क्यार’, महाचक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. यामध्ये भातशेतीचे अतोनात नुकसान होऊन जिल्हय़ातील 76 हजार 494 शेतकरी बाधित होऊन 27 कोटी 43 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाने ही नुकसान भरपाई मंजूर करून टप्प्या-टप्प्याने भरपाईची रक्कम द्यायला सुरुवात केली आहे.
पहिल्या टप्प्यात 21 हजार 154 शेतकऱयांसाठी 6 कोटी 65 लाख 9 हजाराची रक्कम प्राप्त झाली होती. दुसऱया टप्प्यात 37 हजार 798 शेतकऱयांसाठी 14 कोटी 53 लाख 49 हजाराची रक्कम प्राप्त झाली. तिसऱया टप्प्यात 2 हजार 576 शेतकऱयांसाठी 3 कोटी 80 लाख 50 हजाराचा निधी
प्राप्त झाला आहे. तिन्ही टप्प्यात आतापर्यंत 61 हजार 528 शेतकऱयांचा 24 कोटी 99 लाख 8 हजाराचा निधी प्राप्त झाला असून तात्काळ बँक खात्यात रक्कम वितरणाची कार्यवाही सुरू केली आहे. आतापर्यंत 86.52 टक्के शेतकऱयांना 21 कोटी 62 लाख 28 हजार 958 रुपये एवढी रक्कम बँक खाती जमाही करण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱयांना मदत मिळण्याचा शेवटचा टप्पा शिल्लक राहिला आहे. एकूण 14 हजार 966 शेतकऱयांना 2 कोटी 43 लाख 92 हजार निधी देणे शिल्लक आहे. शेवटच्या चौथ्या टप्प्यातील निधी लवकरच प्राप्त होणार आहे. त्यानंतर सर्व नुकसानग्रस्त शेतकऱयांना शंभर टक्के मदत वितरणाची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.