गोवा विद्यापीठातील अन्यायकारक नोकरभरती प्रकरणी गोवा फॉरवर्ड नेत्यांचा कुलगुरूंना घेराव

0
81

पणजी :- गोवा फॉरवर्ड पार्टीचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी आज आपल्‍या पक्षाच्‍या अन्‍य नेत्यांच्या शिष्टमंडळासह गोवा विद्यापीठाच्या नोकर भरती संदर्भात १५ वर्षांच्‍या गोव्‍यातील अधिवासाची अट शिथील करणारी जाहिरात जारी केल्‍याबद्दल कुलगुरुंना घेराव घालून जाब विचारला. यावेळी उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई, उत्तर गोवा जिल्‍हाध्यक्ष दीपक कलंगुटकर, सरचिटणीस संतोषकुमार सावंत, पर्यावरण विभागाचे संयोजक विकास भगत आणि कार्यकारी सदस्य कादर शाह, फ्रेडी त्रावासो यांच्‍यासह विद्यापीठातील काही विद्यार्‍थ्‍यांचाही त्‍यात समावेश होता.

गोवा विद्यापीठाने दाेन जागा भरुन काढण्‍यासाठी २३ ऑगस्‍ट २०२३ रोजी जाहिरात दिली होती. त्‍यातील एक जागा इतर मागासवर्गिय तर दुसरी जागा सर्वसाधारण विभागासाठी होती. या संदर्भात उमेदवारांच्‍या मुलाखतीही घेतल्‍या होत्‍या, पण निवड केली नव्‍हती. २ ऑगस्‍ट २०२४ रोजी पुन्‍हा जाहिरात करुन इतर मागासवर्गिय आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली पदे रद्द करण्‍यात आली. एवढेच नव्‍हे तर यासाठी जी १५ वर्षांच्‍या राज्‍यातील अधिवासाची अट होती तीही रद्द करण्‍यात आली.

या गोष्‍टीला गोवा फॉरवर्डने आक्षेप घेताना, “या पदांसाठी पात्र गोमंतकीय उमेदवार असताना, कुलगुरू बाहेरील लोकांना या जागेवर आणण्याचा विचार का करत आहेत?” असा सवाल नाईक यांनी केला. या पदासाठी पात्र गोमंतकीय उमेदवारांनी मुलाखतीही दिली होती. या उमेदवारांना हाकलून लावण्‍यासाठीच कुरुगुरुनी या मुलाखती घेतल्‍या हाेत्‍या का असा सवाल त्‍यांनी केला.

गाेवा विद्यापीठाच्‍या घसरलेल्‍या दर्जाबद्दल सवाल करताना नाईक यांनी, जर विद्यापीठ बाहेरुन पात्र उमेदवारांना गोवा विद्यापीठात शिकवायला आणत असेल तर विद्यापीठाचा दर्जा सतत का घसरतो असा करुन गोव्‍यातील विद्यार्‍थ्‍यांचा दर्जा सुधारण्‍यासाठी विद्यापीठ हा पैसा का खर्च करीत नाही असा सवाल केला. गोव्‍याबाहेरुन येणार्‍या उमेदवारांना गोव्‍यातील विद्यार्‍थ्‍यांशी कुठलेही देणेघेेणे नसते त्‍यामुळे हे शिक्षक फक्‍त अापला पगार घेण्‍यासाठीच काम करतात. ते गोव्‍यातील विद्यार्‍थ्‍यांशी समरस होत नाहीत. यामुळेच ही परिस्‍थिती उद्‍भवलेली अाहे असे सांगून गोवा फॉरवर्ड हा अन्‍याय सहन करणार नाही असे त्‍यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्डच्‍या आणि विद्यार्‍थ्‍यांच्‍या मागणीवरुन कुलगुरुनी नियोजीत पदासाठीच्‍या मुलाखती थांबविण्‍याचे आश्र्‍वासन दिले आहे. या विषयावर पुढील चर्चा करण्‍यासाठी गोवा फॉरवर्डच्‍या चार सदस्‍यांचे शिष्‍टमंडळ कुलगुरुना भेटणार आहे. गोव्‍यातील उमेदवारांना न्‍याय मिळवून देईपर्यंत गोवा फॉरवर्ड स्‍वस्‍थ रहाणार नाही असे नाईक यांनी म्‍हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here