सिंधुदुर्ग – कोकणातील तिन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. २४ तासात मुसळधार इशारा हवामान खात्याने दिला असल्याने पूरजन्य परिस्थिती होण्याची शक्यता आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा करूळ घाट खचला आहे तर भुईबावडा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
रायगड जिल्ह्यात ११ जुलैपासून पावसाने सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम केला आहे. १२,१३ जुलै रोजी मुसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे. मध्येच सूर्यदर्शन होत आहे. तर काही वेळातच पावसाचे आगमन होत आहे. आज रविवारी (१८जुलै) सकाळी थोडी पावसाने विश्रांती घेतली. मात्र अकरा वाजल्यापासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान, पावसामुळे विजांचाही लपंडाव सुरू आहे
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. राजापूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अर्जुना नदीला पूर आला. राजापूर शहरांमधल्या जवाहर चौकात संध्याकाळी पाणी शिरलं. राजापूर बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेव्यापाऱ्यांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. चिपळूण मध्ये वशिष्टी नदीला पाणी आल्याने चिपळूण बाजारपेठेत काही प्रमाणात पाणी शिरलं. तर दापोलीमध्ये खाडीपट्यात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. दाभोळे मध्ये एका घरावर दगड कोसळून नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट खचल्याने सध्या वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. तर भुईबावडा घाटातून पर्यायी वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र रविवारी भुईबावडा घाटात दरड कोसळली. सलग दोन दिवस या ठिकाणी दरड कोसळत असल्याने काही काळ हा घाट वाहतुकीसाठी बंद होता. दरम्यान दरड हटवून मार्ग एकेरी वाहतुकीला सुरु करण्यात आला असला तरी हि वाहतूक केव्हाही बंद होऊ शकते अशी स्थिती आहे.