कोकणातील युवकांनी शेतीची कास धरावी विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना व मालोंड- मालडी कोल्हापूर पाटबंधारे योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
115

 

सिंधुदुर्ग – शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासीयांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मालवण तालुक्यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना तसेच मालोंड- मालडी कोल्हापूर पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. तर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते जागेचे पूजन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक, खासदार सर्वश्री विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, रोहयो व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, आंगणेवाडी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर आंगणे, बिळवस – आंगणेवाडीचे सरपंच मानसी पालव, मालडीचे सरपंच संदीप आडवलकर, कुंभवडे सरपंच सूर्यकांत तावडे, श्री. वडाळकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, रत्नागिरी, श्री. देवशेट्टे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, अंबडपाल व फोंडाघाट, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाने जगाची आर्थिक गाडी घसरली, पण, या संकटकाळात अर्थचक्राचा डोलारा सांभाळण्याचे काम शेतकऱ्यांनी केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी, मालाचा दर्जा चांगला रहावा, त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी यासाठी शासनाने विकेल ते पिकेल योजना सुरू केली आहे. संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधीच लपवले नाही. म्हणूनच मी गेल्या वर्षी भराडी देवीच्या दर्शनाला आलो होतो. तेंव्हा कोकणातील योजना आणि व्यथांचा विचार केला. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असताना कोरोना आला आणि सगळ ठप्प झाले. असे असले तरी कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच. माझा कोकण संपन्न झाला पाहिजे, त्यासाठी जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने माझ्या कोकणवासियांना माता भगिनींना देतो असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आंगणेवाडीच्या जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल भाविकांना धन्यवाद देतो. माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशिर्वाद मागताना कोकणच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाहीही दिली. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्ष मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेत, याचा निश्चित आनंद आहे. आज आपण सर्वजण एकत्र येऊन कोरोना संकटाचा मुकाबला करत आहोत. आपण सगळे सहकार्य करतो आहोत. म्हणूनच कोरोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकत आहोत असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आपल्या सर्वांनाच माहित आहे की, कोकणात पाऊस भरपूर पडतो, पूर येतो, अतिवृष्टी होते, पण ते संपल्यानंतर सगळ पाणी वाहून समुद्राला मिळते, अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर उरलेले सगळे वर्ष कोरडे जाते. मग अनेक खलबत होतात, योजना पुढे येतात. पण आज अरविंद सावंत, विनायक राऊत यांनी या तीन योजना पुढे आणल्या. त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात येण्यासाठी पाठपुरावा केला. योजनांसाठी पाठपुरावा करून घेता, याला अधिक महत्व आहे. राज्यात अनेक धऱण, पाटबंधारे झाले, पण अजून काही कामे बाकी आहेत. आता आपण गोसीखुर्द धरणाच्या कामाला गती दिली आहे. आज या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाईन करतो आहोत. पण, धरणाच्या उद्घाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईल हे माझे तुम्हाला वचन आहे. अनेकजण स्वतःसाठी काही ना काही मागत असतात, पण कोकणातील लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्वस्त म्हणून काम करत आहेत. स्वतःसाठी काही न मागता जनतेसाठी रुग्णालय आणि इतर गोष्टी मागत असल्याचा मला आनंद असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर रोहयो आणि जलसंधारण विभागाचे अपर मुख्यसचिव नंदकुमार यांनी प्रास्ताविकामध्ये या तीन ही पाटबंधारे योजनांची वैशिष्ट्ये, साठवण क्षमता आणि खर्च याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here