किराणा दुकानदारांनी सत्तार यांच्या तोंडात शेण घालणेच योग्य ठरेल – प्रमोद जठार सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

0
178

सिंधुदुर्ग – कोरोना काळात जिवावर उदार होऊन ग्राहकांना सेवा देणार्‍या किराणा दुकानदारांबद्दल राज्यमंत्री अब्दूल सत्तार अनुद्गार काढत असतील तर सर्व किराणा दुकानदारांनी सत्तार यांच्या तोंडात शेण घालणेच योग्य ठरेल अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रमोद जठार म्हणाले कि हे अब्दुल सत्तार नाहीत तर अब्दुल भिक्कार आहेत. ज्या किराणा मालाच्या व्यापाऱ्यांनी जीवावर उदार होऊन कोरोनाच्या काळात सेवा दिली त्यांच्याद्दल असे उद्गार काढणे योग्य नाही. अनेक व्यापाऱ्यांना या काळात कोरोना झाला. अनेकांचा मृत्यू झाला. याबाबत या मंत्र्यांना काही वाटत नाही हे दुर्दैव आहे असेही जठार म्हणाले.

सिंधुदुर्ग दौर्‍यावर आलेल्या महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्या रेडी बंदरातील दौर्‍यावेळी मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. यावेळी त्यांनी मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क केला. यावेळी मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी ‘आम्हाला किराणा दुकानदार समजलात काय?’ अशी भाषा वापरली. याचा आज भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी समाचार घेतला.

राज्यमंत्र्याचे किराणा दुकानदारांबाबत असे बोलणे योग्य नाही. हा किराणा दुकानदारांचा अपमान आहे. कोरोना काळात अब्दूल सत्तार यांनी किराणा दुकानातून साहित्य घेतले की शेण घेतले असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे. असे सांगताना प्रमोद जठार म्हणाले, भाजपला दगा देऊन शिवसेनेचे सरकार स्थापन केले आहे. यामध्ये अनेक हौशे गवसे मंत्री झाले आहेत. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांचे भान राहिलेले नाही की कुणाबद्दल आदर, मानसन्मान राहिलेला नाही. मात्र राज्यातील किराणा दुकानदारांनी आता एकत्र येऊन अब्दूल सत्तार यांच्या तोंडात शेण घालायला हवे.

सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

दरम्यान महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याचा सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाने समाचार घेतला आहे. महसूल राज्यमंत्र्यांचा थेट “वसूलमंत्री” म्हणून उल्लेख करीत किराणा व्यापारी वसूलमंत्र्यांचे हुजरे नाहीत, तुमचे विधान मागे घ्या अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here