कवयित्री दिशा पिंकी शेख यांना राज्यस्तरीय सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार प्रदान ज्येष्ठ साहित्यिक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण

0
57

हा केवळ दिशाचा नाही तर प्रस्थापित व्यवस्थेच्या, संस्कृतीचा बदलाला प्रतिष्ठानने दिलेला सन्मान – लक्ष्मण गायकवाड

सिंधुदुर्ग : सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान एक क्रांतिकारी वाटचाल करत आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंड करणं सोपं नाही. आज प्रतिष्ठानमार्फत दिशा पिंकी शेखचा झालेला सन्मान हा केवळ दिशाचा नाही तर या प्रस्थापित व्यवस्थेच्या, संस्कृतीच्या बदलाला प्रतिष्ठानने दिलेला सन्मान आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कणकवली येथील सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान मार्फत यावर्षीपासून दिला जाणारा सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या ‘कुरूप’ या काव्यसंग्रहाला प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’ कार लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते दिशा पिंकी शेख यांना हा पुरस्कार कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित, ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, ज्येष्ठ समाजसेवक संदीप परब, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश पवार, प्रतिष्ठानच्या सचिव शुभांगी पवार, प्रतिष्ठानचे सदस्य हरिश्चंद्र सरमळकर, पत्रकार राजन चव्हाण, हर्षदा सरमळकर, ऋजुता चव्हाण, वैशाली कदम, सुरेश पवार, प्रा. मोहन कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी लक्ष्मण गायकवाड आपल्या भावना व्यक्त करताना पुढे म्हणाले की, सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान एक क्रांतिकारी वाटचाल करत आहे. या व्यवस्थेच्या विरोधात बंड करणं सोपं नाही. भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून उपेक्षित वर्ग दबला गेला आहे. दिशा पिंकी शेखला पुरस्कार प्रदान करून या साऱ्या वर्गाला वाचा फोडण्याचं काम हे प्रतिष्ठान करत आहे. पायामध्ये काटा रुतल्यानंतर कुरूप हे घट्ट होतं. ते कापून टाकलं तरी पुन्हा उगवतं. तसंच ही व्यवस्था आहे. त्याला वाचा फोडण्याचं काम दिशाने आपल्या ‘कुरूप’ या काव्यसंग्रहातून केलं आहे. तृतीयपंथीयांचं जगणं त्यांनी आपल्या काव्यसंग्रहातून मांडलं आहे. हा केवळ दिशाचा सन्मान नाही तर या व्यवस्थेच्या, संस्कृतीच्या बदलाला तुम्ही दिलेला सन्मान आहे. धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ आहे हे जेव्हा समाज मान्य करेल तेव्हा दिशा शेख किंवा लक्ष्मण गायकवाड पुस्तक लिहून समाजाला दूषणं देणार नाहीत. असा समाज निर्माण करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे, असे आवाहन लक्ष्मण गायकवाड यांनी केले.

सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कारच्या सत्कारमूर्ती दिशा पिंकी शेख यांनी माझ्या या परिवर्तनाच्या एकूण प्रवासात आपण एका पावलाचं योगदान दिलं आणि हा प्रवास यशाच्या क्षितिजापर्यंत जावा म्हणून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मी तुमची आभारी आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते मला पुरस्कार प्राप्त होणं, हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे. समाजाच्या कोणत्याही शास्त्रात माझं म्हणजेच माझ्या हिजडा जमातीचं वर्णन माणूस म्हणून केलेलं आढळत नाही. हिजडा हा शब्द जरी उच्चारला तरी टाळ्या वाजवणारा, दुवा देणारा, दैवी हसणारा, विक्षिप्त अंगविक्षेप करणारा चेहरा एवढंच आठवतं. कारण चित्रपट, जाहिरातींमधून हाच चेहरा दाखवला जातो. पण आमचा खरा चेहरा कधी बाहेर येतच नाही. तृतीयपंथी म्हणून जन्माला येणं हे काही चूक नाही. हे समाजाने आणि तृतीयपंथीयांनीही समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्वतःच्या आईवडिलांच्या नावाने अनेकजण दरवर्षी वर्षश्राद्ध घालतात, भंडारे करतात, देवाला अभिषेक करतात, सोन्याचे मुकुट चढवतात. त्याचा काहीही परिणाम होत नाही. जर स्वतःच्या आईवडिलांच्या, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या नावाने पुरस्कार दिले, तर माझ्यासारख्या कित्येक दिशांना जगण्याचं बळ मिळेल, अशा शब्दांत दिशा शेख यांनी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानचे आभार मानले.

ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांनी सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान माणसाला माणसाशी जोडणाऱ्या शिवतत्वाशी जोडलेलं आहे आणि साक्षात सरस्वतीचा पुरस्कार दिशाला मिळाला आहे, त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना समाजाच्या उपेक्षित राहिलेल्या घटकांकडे समाजाची नजर जावून त्यांच्याकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ समाजसेवक संदीप परब यांनी आपले विचार व्यक्त करताना दिशा पिंकी शेख करत असलेल्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.

डॉ. सतीश पवार यांनी या पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक केले. वैशाली पंडित आणि मधुसूदन नानिवडेकर यांच्यामुळे या पुरस्काराची कल्पना मनात आली. दिशा पिंकी शेख यांचा कुरूप हा काव्यसंग्रह वाचला आणि त्यांनी मांडलेलं वास्तव वाचून या पुरस्कारासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असे डॉ. सतीश पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या सदस्या कवयित्री ऋजुता चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानच्या सदस्या वौशाली कदम यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here