उच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला दणका; जन्मठेप कायम

0
99

 

मकोका कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याप्रकरणी गवळी तुरूंगात आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अरुण गवळीच्या वकिलांकडून शिक्षेच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना गवळीसह 11 आरोपींची शिक्षा कायम ठेवल्याचे न्यायालयाने सांगितले. 27 ऑगस्ट 2007 रोजी कमलाकर जामसांडेकर या शिवसेना नगरसेवकावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर तपासादरम्यान अरुण गवळीसह 11 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली.आर्थिक व्यवहारावरुन संबंधित हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मकोका न्यायालयामध्ये यावर सुनावणी दरम्यान अरुण गवळीसह अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता उच्च न्यायालयाने या विरोधातील याचिका फेटाळून गवळी गँगला दणका दिला आहे.

2007 साली मार्च महिन्यात सेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. संबंधित हत्या अशोक कुमार जैसवाल, नरेंद्र गिरी आणि विजय गिरी यांनी घडवून आणली.
नंतर अशोक कुमार जैसवालने गोळी झाडल्याचे तपासात समोर आले. या कामासाठी तिघांना अडीच लाख रुपये पुरवण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. तसेच अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच हे हत्याकांड घडवून आणल्याचे त्यांनी कबूल केले. यासंदर्भात न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर गवळीला दोषी ठरवण्यात आले. सध्या अरुण गवळी नागपूर कारागृहात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here