सिंधुदुर्ग – महिला पोलिस कॉन्स्टेबल विनया विठ्ठल राऊळ (वय 25) या नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिच्या मैत्रणीकडे तपास सुरू आहे. अद्याप तिने कशासाठी आत्महत्या केली? हे निष्पन्न झालेले नाही, अशी माहिती सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा या प्रकारणाचा तपास करणारे अधिकारी शिवप्रसाद पवार यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालय येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल विनया राऊळ यांनी 13 सप्टेंबरला रात्री पावणे नऊ ते रात्री 9 वाजुन 20 मिनिटे या कालावधीत जिल्हाधिकारी कॉलनीत राहत असलेल्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांत खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे तीचे पती सुद्धा पोलिस खात्यात आहेत. याप्रकरणी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे.
याबाबत दुसऱ्या दिवशी तपासात काय निष्पन्न झाले का? असे अधिकारी पवार यांना विचारले असता, त्यांनी अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही, असे सांगितले. तिच्या मैत्रिणीकडून अधिक तपास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पवार म्हणाले, विनयाने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवलेली नसली तरी तिने आत्महत्या करण्यापुर्वी पती परेश तांबे याच्या व्हॉट्सऍपला कोणता संदेश सोडला होता का? याची माहिती घेणे गरजेचे आहे.
राहत असलेल्या जिल्हाधिकारी कॉलनीमध्ये विनयाने आत्महत्या करण्यापुर्वी पती आणि तिच्यात किंवा नातेवाईकांत भांडण झाले होते का? याबाबत चौकशी होणार आहे. कारण विनयाने आत्महत्या केल्यानंतर तिच्या शेजारी राहणाऱ्या कॉलनीतील रहिवाशी, तिचा मित्र परिवाराकडून संशयास्पद माहिती पुढे येत आहे. याचा आधार घेवून त्यात तथ्य आहे का? हे पाहण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले