सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातल्या एका मुलीने भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला.ग्रामीण भागातील एक मुलगी उच्च स्तरावर निवड झाल्यानंतर गावांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.गावागावात मुलीच्या नावाची घरोघरी चर्चा केली जात आहे.क्रिकेट बोर्डाने केलेल्या निवड यादीत तिची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघात मालवण तालुक्यातील आंबडोस गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हीची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी २० महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप मिळवून देण्यात प्रकाशिका हिने महत्वाची भूमिका बजावली. तिच्या प्रतिभासंपन्न खेळाची दखल घेत क्रिकेट बोर्डाने केलेल्या निवड यादीत तिची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तिच्या निवडबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
शाळा स्तरापासून क्रिकेट खेळाची अत्यंत आवड असलेल्या प्रकाशिका हीने उत्तरोत्तर आपली प्रगती साधली आहे. सुरुवातीला भारताच्या १९ वर्षाखालील महिलांच्या संघात स्थान प्राप्त केल्यानंतर ती मुंबई महिला संघाची उप कर्णधार बनली होती. त्यानंतर ती मुंबई संघाची कर्णधार म्हणून कार्यरत होती. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी २० स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप मिळाली. यामध्ये प्रकाशिका हिने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे तिची भारतीय महिला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. इंग्लंड देशाचा अ संघ भारत दौऱ्यावर येत आहे.२९नोव्हेंबर आणि १, ३ डिसेंबर असे एकूण तीन सामने होणार आहेत. यामध्ये प्रकाशिका खेळणार आहे. प्रकाशिका ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती राईट हॅन्ड फलंदाज आहे. तसेच राईट आर्म लेग स्पिनर व स्लीप क्षेत्रातील स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून तिची ओळख आहे. तिच्या निवडीने आंबडोस परिसरात आनंद व्यक्त होत आहे. प्रकाशिका हिच्या निवडीने आपल्या गावाचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचणार असल्याच्या भावना आंबडोस गाववासियांकडून व्यक्त होत असून यासाठी तिला शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.