सिंधुदुर्ग – सावंतवाडी शहरात झालेल्या “जिओ” मोबाईलसाठी चर खोदाईच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाला आहे. सुरू असलेल्या चुकीच्या कामाला नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदार आहेत.
विरोधी नगरसेवकांना अंधारात ठेवून हे रस्ते खोदण्यात आले, असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या गटनेत्या माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबो यांनी केला.
दरम्यान १ कोटी ५२ लाखाचे सुरू असलेले चर बुजवायचे काम हे “डुप्लिकेट” ठेकेदाराकडून सुरू आहे. या कामासाठी एकाही नगरसेवकाने कोणाकडून पैसे आणि पाकीटं घेतले नाही, असेही स्पष्टीकरण लोबो यांनी यावेळी दिले.
यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, दिपाली सावंत, भारती मोरे, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते.
लोबो पुढे म्हणाल्या, शहरात सुरू असलेले जिओ केबल साठीचे चर खुदाईचे काम दिवाळी नंतर करा, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र त्याकडे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकार्यांनी दुर्लक्ष केले.
त्यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांसह व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तर खोदलेल्या चरात अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान सद्यस्थितीत त्याठिकाणी खोदण्यात आलेले चर बुजविण्याचे काम पालिकेकडू चालू आहे. मात्र त्याठिकाणी “डुप्लिकेट” ठेकेदार ठेवण्यात आल्यामुळे निष्काळजीपणाने हे काम सुरू आहे.