सहा डिसेंबरचा राम मंदिराबाबतचा निर्णय देशात एक मोठी गोष्ट – शरद पवार

0
277

येत्या सहा डिसेंबरला देशात एक मोठी गोष्ट घडणार आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. न्यायालय काय निर्णय काय देईल माहीत नाही, पण समजा मंदिराच्या बाजूने निर्णय झाला, तर हिंदू समाजात आनंद होईल, मात्र मुस्लीम समाजात अस्वस्थता पसरेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. बारामती येथील मर्चंट असोसिएशनच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व कर्जतचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार उपस्थित होते. आज सुदैवाने देशातील मुस्लीम समाजाने सामंजस्यपणा दाखवला आणि न्यायालयाचा निर्णय मंदिराच्या बाजूने आला, तर त्याचे आम्ही स्वागत करू, अशी पवारांनी जाहीर भूमिका घेतली आहे. परंतु, अयोध्येतील जागेप्रकरणी एका बाजूला मंदिर, एका बाजूला मशीद बांधण्याचा न्यायालयाने निर्णय दिला, तर पुन्हा यासंदर्भात काही चर्चा होईल, असे मला वाटत नाही, असेही पवार यावेळी म्हणाले. सध्या देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून देशातील उद्योग-व्यापार संकटात आहेत. सरकारमधील लोकांना उद्योगधंद्यामध्ये जो परिणाम झालेला दिसतो, त्याबाबत विचारले तर ते पुलवामा वैगेरे सांगतील. नंतर पुढे हे परिणाम नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे, तर 370, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की 370, व्यापारावर उद्योगधंद्यावर परिणाम काय झाला की 370, अर्थव्यवस्थेचा प्रश्‍न असू देत तरी 370 अशी उत्तरे सरकारकडून दिले जाईल, असे पवारांनी बोलत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here