मालवण येथे समुद्रात सहा ते सात नॉटिकल अंतरावर एक मालवाहक जहाज उभे असल्याचे बुधवारी स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास आले. स्थानिक मच्छीमारांनी याची माहिती सागरी पोलीस यंत्रणेला दिली. सागरी पोलीस दलाने सतर्कता दाखवित तत्काळ ते जहाजापर्यंत पोहोचले. ‘त्या’ जहाजावरील कर्मचाऱयांची चौकशी केली असता, जहाज श्रीलंकेतील असल्याचे निदर्शनास आले. जहाजावरील सिलिंडर संपल्याने ते मालवण समुद्रात उभे असल्याचे त्या कर्मचाऱयांनी सांगितले.
भारतीय नौदलाच्या पथकाकडून या जहाजाची चौकशी करण्यात आली आहे. या जहाजावरील अन्नसाठाही संपल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काही दिवसांपूर्वी जयगड बंदरातून ते जहाज मालवणच्या दिशेने गोव्याकडे जाण्यासाठी रवाना झाले होते. अन्नसाठा संपल्याने बोटीवरील कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेतील शिपिंग कंपनीचे जहाज
हे जहाज श्रीलंकेतील ‘वेस्ट पोस्ट शिपिंग’ कंपनीचे आहे. जहाज शारजा येथून ऑगस्ट महिन्यात निघाले होते. परंतु अरबी सुमद्रात आल्यावर जहाजावरील सहा सिलिंडरपैकी एक सिलिंडर बंद पडल्याने ते येथे समुद्रात बंद स्थितीत उभे आहे. या कर्मचाऱयांनी काही दिवसांपूर्वी जहाज दुरुस्तीठी गोवा पोर्टकडे मदत मागितली होती. परंतु, त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सध्या हे जहाज गोवा पोर्टच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. गोवा पोर्टकडून जहाजाला दुरुस्तीची परवानगी मिळाली, तरच ते श्रीलंकेला परत जाऊ शकते. याबाबत दांडी येथील महेंद्र पराडकर यांनी सागरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांना एक जहाज समुद्रात उभे असल्याची माहिती दिली होती.
जहाजावर 13 नागरिक
सद्यस्थितीत जहाजावर 13 जण आहेत. यात भारतीय-10, श्रीलंका-1, फिलिपाईन्स-1, इथोपिया-1 असे नागरिक आहेत. जहाजावर एएसआय सिस्टिम बसविलेली नाही. त्यामुळे त्या जहाजाशी रडारवरून संपर्क होत नसल्याचे सागरी पोलिसांकडून सांगण्यात आले.
नऊ महिने सुरू आहे प्रवास
दुबईहून ऑगस्टमध्ये सुटलेले जहाज गेली नऊ महिने प्रवास करत आहे. या जहाजाच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने त्याची अंतर कापण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे जहाजामध्ये बिघाड कधी झाला, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. कर्मचाऱयांना आवश्यकता भासल्यास अन्नधान्य देण्यासंदर्भातही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मालवण पोलिसांच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागून राहिले आहे.
पुढील कार्यवाही वरिष्ठ स्तरावरून
मालवण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी याबाबत माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला आहे. या जहाजाची माहिती घेऊन वरिष्ठस्तरावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे समजते.