31 C
Panjim
Thursday, February 9, 2023

महाराष्ट्रात खातेवाटपानंतरही मंत्र्यांची नाराजी दूर होईना !

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

राज्य मंत्रिमंडळाचे रखडलेले बहुचर्चित खातेवाटप सात दिवसांनंतर अखेर रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले. पसंतीची खाती न मिळाल्याने काही मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली. राजीनाम्याची हूल दिलेले शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना ‘मातोश्री’वर समज देण्यात आली. राष्ट्रवादीत धक्कातंत्राचा अवलंब करण्यात आल्याने ज्येष्ठ नेत्यांची पंचाईत झाली, तर मंत्रिपदे न मिळालेल्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे सांगण्याची वेळ काँग्रेसवर आली.

खातेवाटपाची यादी शनिवारी रात्री राजभवनावर सादर करण्यात आली होती. राज्यपालांची रविवारी सकाळी मान्यता मिळाल्यावर खातेवाटप अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. शनिवारी प्रत्येक पक्षाने आपापल्या मंत्र्यांची खाती जाहीर केली होती. काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद भूषवूनही महाविकास आघाडीत राज्यमंत्रिपद मिळाल्याने औरंगाबादचे अब्दुल सत्तार हे नाराज होते. त्यातच औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांनी वेगळी भूमिका घेतली होती. यानंतर सत्तार यांनी राजीनाम्याचा इशारा दिला होता. सत्तार यांना रविवारी ‘मातोश्री’वर पाचारण करण्यात आले होते. तिथे त्यांना योग्य समज देण्यात आल्याचे शिवसेनेच्या वर्तुळातून सांगण्यात आले. आता काँग्रेसमध्ये नव्हे तर शिवसेनेत आहात, याची त्यांना जाणीव करून देण्यात आली. मात्र आपल्या राजीनाम्याच्या अफवा पसरविण्यात आल्याचे सत्तार यांनी सांगितले.

खातेवाटपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामान्य प्रशासन, विधि व न्याय, माहिती जनसंपर्क आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती स्वत:कडे ठेवली आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार ही तीन खाती सोपविण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकासासह रस्ते विकास महामंडळाचा कार्यभार कायम ठेवण्यात आला. शिवसेनेने ग्रामीण भागाशी संबंधित कृषी खाते दादा भुसे, पाणीपुरवठा खाते गुलाबराव पाटील, रोजगार हमी हे संदिपान भुमरे, वने हे खाते संजय राठोड यांच्याकडे सोपवले.

काँग्रेसमध्ये धुसफुस

काँग्रेसमध्ये अमित देशमुख (वैद्यकीय शिक्षण), सुनील केदार (दुग्धविकास), विजय वडेट्टीवार (इतर मागासवर्ग कल्याण), राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी मंत्री खातेवाटपावरून फारसे समाधानी नसल्याचे समजते. अर्थात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त  करण्याचे टाळले. त्यांच्या वाटय़ाला येणारी खाती बदलून देण्याची मागणी त्यांनी खातेवाटपापूर्वी केली होती. यातूनच राज्यातील नेत्यांनी खातेवाटपाची जबाबदारी दिल्लीतील नेत्यांवर सोपवली. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार कैलाश गोरंटय़ाल यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. त्यांच्याशी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चर्चा केली. मंत्रिपदे न मिळालेल्यांचा योग्य सन्मान राखू, असे थोरात यांनी रविवारी जाहीर केले.

राष्ट्रवादीत धक्कातंत्र

राष्ट्रवादी काँग्रेसने गृहखाते अनिल देशमुख यांच्याकडे सोपविले. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा तर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे कामगार आणि उत्पादन शुल्क ही तुलनेत कमी महत्त्वाची खाती सोपवून पक्षाने ज्येष्ठ नेत्यांना सूचक संदेश दिला. पवारांचे विश्वासू जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. त्याच वेळी अजितदादांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांच्याकडे समाजकल्याणची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रवादीत खातेवाटपावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली असली तरी पवारांच्या धाकापोटी जाहीरपणे प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले जात असल्याचे मानले जाते.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles