नवोदयच्या विद्यार्थ्यांना घेऊन बस निघाल्या उत्तरप्रदेशात विद्यालय प्रशासनाने भरले एसटीकडे साडेतीन लाख रुपये

0
124

 

सिंधुदुर्ग – परराज्यात जाण्याची परवानगी शासनाने दिल्यानंतर सांगेली नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांची बॅच सावंतवाडी येथून शिवशाही बसने सोमवारी रात्री निघाली आहे. उत्तर प्रदेशातील 21 विद्यार्थी व चार शिक्षकांना सावंतवाडी एसटी आगारातून शिवशाही बसने जाण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये नवोदय विद्यालय प्रशासनाला मोजावे लागले आहेत.

‘लॉकडाऊन’ काळात उत्तर प्रदेशातील या विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग दोनवेळा करूनही रद्द करण्याची वेळ आली होती. दोन मे रोजी रेल्वेचे बुकिंग करण्यात आले होते. मात्र, सध्या लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविल्याने आणि रेल्वे बंद असल्याने उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी त्यांना शिवशाहीचा आधार घ्यावा लागला आहे.

बससोबत दिले दोन चालक, एक मेकॅनिक

नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्रीजीतबाबू यांनी विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी के.  मंजुलक्ष्मी यांच्याकडून परवानगी घेतली. त्यानुसार सावंतवाडी एसटी आगारातून शिवशाही बस सोमवारी रात्री एकच्या सुमारास विद्यालयातील सात मुली, 14 मुलगे आणि चार शिक्षकांना घेऊन निघाल्या. या बससोबत दोन चालक, एक मेकॅनिक दिला गेला आहे. जिल्हय़ातून उत्तर प्रदेशात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही पहिलीच बस आहे. यासाठी विद्यालयाने एसटी महामंडळाला 3 लाख 20 हजार रुपये डिपॉझिट भरले आहे. तर डिझेलसाठी 40 हजार व परमिटची रक्कम प्रशासनाला भरावी लागली आहे.

प्राचार्य श्रीजीतबाबू यांनी सांगितले की, विद्यालय प्रशासनाच्या खर्चाने मुलांना गावी पाठविण्यात येत आहे. उत्तरप्रदेशात जाण्यासाठी 33 तास लागणार आहेत. या कालावधीत या विद्यार्थ्यांना वाटेतील विद्यालयात काही काळ विश्रांती देऊन त्यांच्या गावी पोहोचविले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here