पणजी: विन्सन वर्ल्ड आणि फक्त मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा उद्धाटन सोहळा काल सायंकाळी गोवा कला अकादमी मध्ये पार पडला. गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या सोहळ्याचे उदघाटन झाले.
गोवा कला आणि सांस्कृतिक मंत्री श्री. गोविंद गावडे, शिवसेना नेते तथा खासदार श्री. संजय राऊत, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांची प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्यास उपस्थिती लाभली होती. तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांची देखील उपस्थिती होती.
दरवर्षी गोव्या मध्ये IFFI होत असतो परंतु, IFFI पेक्षा हि जास्त कलाकारांची हजेरी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला लाभली आहे असे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उदघाटन प्रसंगी आपल्या भाषणात म्हटले. तसेच गोव्यात फिल्म सिटी उभी राहावी यासंदर्भात देखील विचार करण्यात येईल असे ते म्हणाले. “फिल्म सिटी उभी करायची असल्यास सगळ्यांनी एकत्र येऊन त्यासाठी काम केले पाहिजे. त्यासाठी सरकार सगळ्या प्रकाराचे सहकार्य नक्कीच करेल.” डॉ. उत्तमरीत्या प्रमोद सावंत.
मराठी कलाकारांच्या दिलखेचक नृत्याची मेजवानी सोहळ्याला लाभली होती. या महोत्सवात काही मान्यवरांचा गौरव देखील करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार सचिन पिळगांवकर, चतुरस्त्र अभिनेत्री पुरस्कार वर्षा उसगांवकर तर चतुरस्त्र अभिनेता पुरस्कार भरत जाधव यांना देऊन गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे प्रोफ. समर नखाते, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते प्रसाद ओक यांना देखील विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या संपूर्ण रंगतदार सोहळ्याला फक्त मराठी वाहिनीची साथ लाभली होती. या वर्षी हा सोहळा फक्त गोव्यापुरताच मर्यादित न राहता तो गोव्याबाहेरील लोकांपर्यंत पोहचावा यासाठी फक्त मराठी वाहिनीवरून हा संपूर्ण सोहळा प्रसारित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि मृणाल देशपांडे यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडले. मानसी नाईक यांच्या नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.