प्रतिनिधी/रायगड
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त आणि परवाना अधिकारी शिवराज चव्हाण यांना लाचलुचपत विभागाने शनिवारी २ लाखांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली. यातील प्रदीप वस्त यांना दोन- अडीच वर्षांपूर्वी आ. नितेश राणेंच्या बांगडाफेक आंदोलनाला सामोरे जावे लागले होते.
मालवण येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील भ्रष्ट कारभारा विरोधात दोन- अडीच वर्षांपूर्वी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांनी आंदोलन छेडले होते. यावेळी प्रदीप वस्त या अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने प्रदीप वस्त याच्यावर संतप्त मच्छिमारांनी बांगडा फेकला होता. त्यावेळी हे बांगडाफेक आंदोलन राज्यात गाजले होते. पारंपरिक मच्छीमारांनी या आंदोलनाचे समर्थन केले होते. मात्र सत्ताधारी पालकमंत्री आणि आमदारांनी या आंदोलनावरून नितेश राणेंना टार्गेट केले होते. यानंतरच्या काळातही प्रदीप वस्त काहीवेळा अडचणीत आले. मात्र प्रत्येकवेळी त्यांना राजाश्रय मिळल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती.
शुक्रवारी रात्री मत्स्यव्यवसाय खात्याच्या गस्तीनौकेवर सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त आणि परवाना अधिकारी शिवराज चव्हाण ड्युटीवर होते. त्यावेळी एक पर्ससीन नौका मासेमारी करताना मिळून आली. त्यावेळी नौका मालकाकडे या दोन अधिकाऱ्यांनी ५ लाख रुपये मागितले. अन्यथा नौका जप्त करण्याची धमकी देण्यात आली. यावेळी ५ लाखांची तडजोड ३ लाखाना करण्यात आली. तर याच मालकाच्या दुसऱ्या पर्ससीन ट्रॉलर्सवर मे महिन्यापर्यंत कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपये असा ५ लाखांचा व्यवहार निश्चित करण्यात आला. या ५ लाखांपैकी २ लाख रुपये शनिवारी दुपारी कार्यालयात देण्याचे ठरवण्यात आले. उर्वरित २ लाख रुपये फेब्रुवारी महिन्यात तर १ लाख रुपये मार्च महिन्यात देण्याची सूचना प्रदीप वस्त यांनी केली. मे महिन्यापर्यंत कारवाई पासून वाचवण्यासाठी मत्स्यव्यवसायच्या अधिकाऱ्यांनी ५ लाख रुपये मागितल्याने नौकामालकाने लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली. याची शहानिशा केली असता या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने लाचलुचपत विभागाने शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडे सापळा रचला. यावेळी कार्यालयात २ लाख रुपये स्विकारताना प्रदीप वस्त आणि शिवराज चव्हाण यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, जनार्दन रेवंडकर, रवी पालकर, अजित खंडे, प्रथमेश पोतनीस यांनी केली.