सिंधुदुर्ग – मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर झालेल्या राड्याचा वाद थंडावत असतानाच आता सिंधुदुर्गात कुडाळ येते शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाला आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.