सिंधुदुर्ग – जिल्ह्यात चोरट्यांनी दहशत पुन्हा एकदा सुरु झाली आहे. कणकवली शहरात चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल १० फ्लॅट फोडल्याची घटना घडली आहे. चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. पोलीस शोध घेत आहेत.
कणकवली शहरातील मराठा मंडळ रस्त्यावर असलेल्या बिल्डिंग मधील तब्बल दहा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. शनिवारी भल्या पहाटे घडलेल्या या घटनेप्रसंगी काही नागरिकांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी त्यांच्यावर विटा भिरकावतानाच कटवणीची भीती दाखवत तेथून पळ काढला. घटनेची माहिती समजतात पोलिसांनी घटनास्थळ गाठले. विशेष म्हणजे चोरट्यांनी फ्लॅट फोडीप्रसंगी वसाहतीमधील चालू स्थितितील बहुतांश फ्लॅटना बाहेरून कड्या घातल्या होत्या.
चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून यात तीनजण दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून शांत असलेले चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे. दरम्यान फोडण्यात आलेल्या फ्लॅट पैकी बरेच जण बाहेरगावी असल्याने चोरीस गेलेला नेमका मुद्देमाल समजू शकला नव्हता. मात्र यातील एका फ्लॅटमधून जवळपास पाच तोळ्याचे दागिने व काही रोकड चोरट्यांनी लंपास केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.