सिंधुदुर्ग – “सुसाईड नोट” लिहून बेपत्ता झालेल्या बँक अधिकारी मनोहर गावडे याचा शोध लावण्यास सावंतवाडी पोलिसांना अद्याप पर्यंत यश आलेले नाही.
त्यामुळे आक्रमक झालेल्या कारीवडे व सोनुर्ली येथील महिलांनी आज येथील पोलिस ठाण्याला घेराव घातला. यावेळी चिठ्ठीत उल्लेख करण्यात आलेल्या त्या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा.
अन्यथा कारवाई झाल्याशिवाय आम्ही पोलिस ठाण्यातून हलणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेवून त्या दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले.
ओटवणे येथे नदीकिनारी गाडी ठेवून बेपत्ता झालेल्या गावडे या बँक अधिकाऱ्याचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. गेले तीन दिवस तपास सुरू आहे. परंतु तो मिळून आलेला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मात्र पोलिस योग्य दृष्टीने तपास करत नाही. तीन दिवस पोलिस वरवरची शोध मोहीम राबवत आहेत, असा आरोप करत तब्बल १०० हून अधिक महिला ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांना जाब विचारला.
त्यावेळी त्या चिठ्ठीत उल्लेख असलेल्या त्या दोघा तरुणांना तात्काळ अटक करा, अन्यथा आपण माघार घेणार नाही, असा इशारा पोलिसांना दिला आहे.