संगमेश्वर दि . ३० ( प्रतिनिधी ) :- कलाकाराच्या अंतर्मनात जे दडलेले असते किंवा त्याला शब्दातून जे मांडता येत नाही ते कलाकार आपल्या कलाकृतीतून सर्वांसमोर ठेवत असतो . कलाकारांना जे काही सांगायचे आहे ते एखाद्यावेळी समोरच्या प्रत्येकाला समजतेच असेही नाही . तरीही कलेचे विश्व हे खूप मोठे आहे . कोकणात १९९३ साली स्थापन झालेल्या सह्याद्री कला महाविद्यालयाने आजवर अनेक कलाकार घडवले . सह्याद्री कला महाविद्यालयात घडणारा कलाकार हा मोठ्या ताकतीचा असतो . येथील कलाकारांनी कलाक्षेत्रात स्वतः बरोबरच कोकणचे नांव सर्वदूर पोहचवले . गेल्या २७ वर्षात जो प्रयोग केला गेला नाही , तो यावर्षी येथील सहा विद्यार्थ्यांनी करण्याचे ठरविले असून मुंबईच्या आर्ट गॅलरीत कोकणी मुद्रा उमटविण्याचे ठरविले आहे . सीवूड येथील गॅलरीत ८ ते १८ फेब्रुवारी दरम्यान सहा विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरणार आहे .
सह्याद्री कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आंतरराष्ट्रीय चित्रकार – शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांच्या कलाकृतींची आजवर देशाच्या विविध भागात प्रदर्शने भरली आहेत . त्यांच्याच प्रेरणेतून आणि प्रयत्नातून सावर्डे येथे उभे राहिलेले सह्याद्री शिक्षण संस्थेचे सह्याद्री चित्र शिल्प कला महाविद्यालय हे राज्यातील एक अग्रगण्य कला महाविद्यालय म्हणून ओळखले जाते . चित्रकार प्रकाश राजेशिर्के आणि प्राचार्य माणिक यादव यांच्याकडून प्रेरणा आणि प्रोत्साहन घेऊन यावर्षी रेखा आणि रंगकला विभागात शिकणाऱ्या अमेय कोलते, हेमंत यशवंत सावंत, कौस्तुभ लीलाधर सुतार, किरण रामचंद्र खापरे, श्रुती चारुदत्त सोमण व अंकिता शंकर सुर्वे या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विषयाची निवड करुन मुंबईच्या गॅलरीत कला प्रदर्शन भरविण्याचा धाडसी निर्णय घेतला.
कला महाविद्यालयात काम करीत असतांना प्रत्येकाने स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली होतीच . या शैलीला धरुनच जलरंग , ॲक्रॅलिक आणि तैलरंग या माध्यमात काम करीत गत वर्षभर मेहनत घेत या विद्यार्थ्यांनी काही अप्रतिम अशा कलाकृती तयार केल्या . प्रत्येकाची काम करण्याची शैली स्वतंत्र असल्याने प्रत्येकाचे विषयही वेगळे आहेत याबरोबरच माध्यमेही वेगवेगळी असल्याने यांच्या चित्रात तोचतोचपणा दिसत नाही . विद्यार्थी दशेत कला विषय शिकत असतांनाची मन:स्थिती आणि कलेच्या माध्यमातून कक्षा विस्तारल्यानंतर बाहेरील जगात सुरु असलेले कलाकारांचे काम या दोन्हींचा उत्तम मिलाफ या सहाही होतकरू कलाकारांच्या कलाकृतीतून पाहायला मिळतो . या कलाकृतीतून कोकणातील निसर्ग , व्यक्तीचित्रण , कंपोझिशन हे विषय पाहायला मिळणार आहेत . या कला प्रदर्शनाबाबत बोलतांना हेमंत सावंत म्हणाला की , आमच्या मनातील विषय आम्ही चित्राच्या माध्यामातून कला रसिकांसमोर ठेवणार आहोत . या प्रयत्नातून आम्हाला आत्मविश्वास मिळवायचा आहे. याबरोबरच कला रसिकांची रुची जाणून घेण्याचाही प्रयत्न असणार आहे . कला जीवनात विद्यार्थी दशेत मुंबई सारख्या कला दालनात चित्र प्रदर्शन भरवून अनुभवाची शिदोरी सोबत बांधून पुढील प्रवास करण्याची आमची खरी ईच्छा आहे .
हे कलाप्रदर्शन नेक्सस आर्ट गॅलरी सीवूड, मुंबई येथे होणार असून कला प्रदर्शनाची तारीख ८ फेब्रुवारी २०२० संध्याकाळी ५ वा सर्वांसाठी प्रदर्शन खुले होणार असून ते १८ फेब्रुवारी २०२० पर्यंत सकाळी ११ ते रात्र ९ वा . पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे . सर्व कलारसिक, चित्रकार, कलाप्रेमी, चित्र संग्राहक अशा सर्वांना ही एक चांगली संधी आहे . या कलाप्रदर्शनाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद देवून या उदयोन्मूख कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे .
चौकट : प्रकाश राजेशिर्के ( आंतरराष्ट्रीय शिल्पकार – चित्रकार ) :- विद्यार्थी दशेत प्रथमच आमच्या कला महाविद्यालयातील विद्यार्थी मुंबईत कला प्रदर्शन भरवित आहेत ही सह्याद्री शिक्षण संस्था आणि आमच्या कला महाविद्यालयासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे . या सहा कलाकारांनी गृप शो साठी आज जी जिद्द दाखवली आहे ती भविष्यातील कला प्रवासात कायम ठेवावी . प्रत्येक कलाकाराची विचारांची स्वतंत्र झेप आणि यातून निर्माण झालेल्या कलाकृती हे या प्रदर्शनाचे खरे वैशिष्ट्य आहे. हे कलाकार भविष्यात स्वतःचे आणि कोकणचे नांव उज्वल करतील असा आपल्याला विश्वास आहे .