
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने संतापलेले आमदार नितेश राणे आणि स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्याला दमबाजी करत त्यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतलं. त्यानंतर या उपअभियंत्याला धक्काबुक्की करत पुलावरच बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने संतापलेले आमदार नितेश राणे आणि स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्याला दमबाजी करत त्यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतलं. त्यानंतर या उपअभियंत्याला धक्काबुक्की करत पुलावरच बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण होऊनही खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने कोणतीच हालचाल न केल्याने नितेश राणे यांचा संतापाचा भडका उडाला. नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर घेरून अरेरावी करायला सुरुवात केली. ‘येथील नागरिक चिखलाचा मारा सहन करत आहे. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या,’ असं राणे यांनी शेडेकर यांना दरडावताच स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बादलीभर चिखलाचं पाणी शेडेकर यांच्या अंगावर ओतलं.
त्यानंतर राणे यांनी चिखल आणि खड्ड्यांमुळे कणकवलीची वाट लागली आहे. त्याला तुम्हीच जबाबदार आहात, असं सांगत शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पुलापर्यंत पायी चालत नेले आणि त्यांना चिखल तसेच खड्ड्यांचं साम्राज्य दाखवलं. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी गडनदी पुलावरच शेडेकर यांना बांधून त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्नही केला. या सर्व प्रकारामुळे अभियंतावर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.