रविवारी जिल्हय़ात एकही संशयित दाखल नसून 3 पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील 96 रूग्ण जिल्हय़ातील रूग्णालयात क्वारंटाईनमध्ये आहेत. यातील सर्वाधिक 62 रूग्ण हे रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात असून तब्बल 103 संशयितांचे स्वॅबचे नमुने मिरज येथे पाठवण्यात आले आहेत, मात्र त्या ठिकाणीही वर्कलोड अधिक असल्याने अद्यापही अहवाल आलेले नाहीत. अजून 2 दिवस या अहवालासाठी लागणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ापासून कोकणातील संशयित रूग्णांचे स्वॅब हे मिरज लॅबला पाठवण्यात येत आहेत. तत्पूर्वी ते पुणे येथे पाठवले जात होते, मात्र पुणे येथे मोठय़ा प्रमाणावर कर्मचारीवर्ग असल्याने हे रिपोर्ट लवकर येत होते. मिरज येथे रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथून रूग्णांचे स्वॅब पाठवले जात असल्याने या ठिकाणी मनुष्यबळ कमी आणि वर्कलोड अधिक असल्याने रिपोर्ट उशीरा प्राप्त होत आहेत. रत्नागिरीतील तब्बल 103 रिपोर्ट पेडिंग असून अद्यापही याचे रिपोर्ट आलेले नाहीत.
तिघा पॉझिटीव्ह रूग्णांवर सुरळीतपणे उपचार सुरू
रत्नागिरी जिल्हय़ात खेड येथे एका पॉझिटिव्ह रूग्णाचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कातील 27 जण कळंबणी रूग्णालयात क्वारंटाईन तर कामथे रूग्णालयात 2 जण क्वारंटाईनमध्ये आहेत तर साखरतर व राजीवडा परिसरात 3 पॉझिटीव्ह रूग्ण आढळले होते. यांच्या संपर्कातील 62 जण क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे यांनी दिली. रत्नागिरीतील तिघा पॉझिटीव्ह रूग्णांवर सुरळीतपणे उपचार सुरू आहेत. तर जिल्हय़ातील संशयित 103 रूग्णांचे रिपोर्ट येत्या दोन दिवसात येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.