सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यात कर्ली खाडी पात्रात देवली व आंबेरी याठिकाणी अवैधरित्या वाळू उपासा हो असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलीत देवली येथील कर्ली खाडी पात्रात वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी उभारलेले १३ दगडी रॅम्प प्रशासनाने उध्वस्त करत कारवाई केली.
सकाळीच झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मालवण तालुक्यातील गडनदी, कलावल खाडी तसेच कर्ली खाडी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मर्डे डांगमोडे येथील गडनदी पात्रात होणाऱ्या अवैध वाळू उपशावर ग्रामस्थांच्या रोषानंतर महसूल प्रशासनाने त्याठिकाणी कारवाई केली होती.
तर कर्ली खाडी पात्रात देवली येथेही अवैध वाळू उपसा सुरु असून याबाबत कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित झाला होता. ग्रामस्थ वेळोवेळी आवाज उठवत असताना देखील महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नव्हती.
या पार्श्वभूमीवर देवली येथील या अवैध वाळू उपशाबाबत कारवाई करण्याची जाग अखेर महसूल प्रशासनाला आली. आज सकाळी महसूल च्या पथकाने देवली येथील वाळू उपशाच्या ठिकाणी धडक देत कारवाईचा बडगा उगारला.
या कारवाईत दगडी रॅम्प उध्वस्त करण्यात आले. ही कारवाई मंडळ अधिकारी पीटर लोबो, देवली तलाठी व्ही. एम. राठोड, कुंभारमाठ तलाठी व्ही. एस. ठाकूर, देवली पोलीस पाटील देऊलकर, कोतवाल देऊलकर यांच्या पथकाने केली.