सिंधुदुर्ग – कोरोनाने सर्वच गोष्टीवर निर्बंध आले आहेत. त्यातून उत्सव सुद्धा सुटले नाही आहेत. परंतु यातून सुद्धा मार्ग काढत दोन राज्यांच्या सीमेवर रक्षा बंधन कार्यक्रमासाठी एकत्र येत मार्ग काढलाय तो सिंधुदुर्ग आणि गोव्यातील बहीण भावाने. रक्षा बंधन सणाला राखी बांधून घेण्यासाठी बहीण भाउ उत्सुक असतात, परंतु या कोरोना मुळे त्यावर सुद्धा निर्बंध आले आहेत. विवाहित बहीण राखी बांधण्यासाठी ना येऊ शकत होती की भाऊ तिच्या घरी जाऊ शकत होता. त्यातच या भाऊ बहिणीचे केवळ जिल्हा नाही तर राज्य सुद्धा वेगळे होते. अखेर थेट दोन्ही राज्यांच्या सीमेवर येत या भाउ बहिणीने रक्षा बंधन पूर्ण केले.
गोवा राज्यातील पेडणे नागझर येथील सुवर्णकार विलास पंदूरकर यांची मोठी बहीण आसावरी धारगळकर यांचे सासर महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे आहे. रक्षा बंधन सोहळ्याला प्रतिवर्षी त्या भाऊ विलास याच्या कडे राखी बांधायला जायच्या परंतु यावर्षी कोरोना मुळे शक्य नसल्याने त्यांनी थेट भावालाच पत्रादेवी सीमेवर रक्षा बंधन करण्यासाठी बोलाविले. व त्या अगदी ओवाळणी साठी निरांजन, तबक घेऊन सीमेवर पोहोचल्या नंतर भावाची ओवाळणी करून, गोड खाऊ भरविल्या नंतर राखी बांधताना आसावरी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. भाउ सुद्धा बहिणीच्या या प्रेमाचा स्वीकार करत पुन्हा निरोप घेऊन आनंदाने घरी परतला. सीमेवरील या अनोख्या रक्षा बंधनाने मात्र कोरोनाच्या निगेटिव्ह वातावरणात सुद्धा या भावबहिणीच्या सीमेपलीकडील रक्षा बंधनाने उत्सवाची परंपरा अबाधित राखली इतके मात्र खरे.



