येत्या काही दिवसात खासगी विमानाद्वारे हापूस पेटय़ा युरोपमध्ये पाठवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आखाती देशामधील यशस्वी निर्यातीनंतर हापूस आता हवाईमार्गे युरोपमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे.
दरवर्षी 20 एप्रिलपर्यंत युरोपसह अन्य देशांमधील निर्यातीला प्रारंभ होतो. यंदा कोरोनामुळे विलंब झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये युरोपीय देशांच्या निकषानुसार हापूसवर योग्य ती प्रक्रीया करुन हवाईमार्गे हापूस निर्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक उष्ण जल व बाष्पजल प्रक्रिया करणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी यंदा कोरोनामुळे खासगी चार्टर्ड विमानाचा उपयोग करावा लागणार आहे. त्याचा परिणाम वाहतूक दरावर होणार आहे. सुमारे 3 किलोच्या बॉक्सला व्यवसायिकांना 500 रूपये दर द्यावा लागण्याची शक्यता आहे. वाशीतील शेतमाल निर्यात केंद्रातून हापूस निर्यातीसाठी पावले उचलण्यात आली आहेत.
आतापर्यंत वाशीमधून संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कतार आदी आखाती देशात जहाजातून 4 लाखाहून अधिक आंबा पेटय़ा पाठवण्यात आल्या आहेत. विमान सेवा पूर्ववत झाल्यानंतर युरोपीय देशांमध्ये हापूस पाठवण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. परंतु काही व्यापारी खाजगी विमानाद्वारे हापूस निर्यात करण्यासाठी सरसावले आहेत.