सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना पाहिजेत पीपीई किट्स

0
153

 

सिंधुदुर्ग – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांना पीपीई किट्स दावाय,  केंद्र शासनाने घोषित केलेल्या मोफत तांदूळ वाटपाचे कमिशन मिळावे. लाभार्थ्यांच्या कार्डवरील ऑनलाईन व्यक्ती संख्या ही ई-सेवा केंद्रामार्फत कमी-जास्त करावी, अशा मागण्या सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटना यांच्यातर्फे कणकवली तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

धान्य वाटपाबाबत शासनाकडून 27 एप्रिलच्या परिपत्रकानुसार दुकानदारांनी लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याचे आदेश आहेत. पण, धान्य नेण्यास ग्राहकांची झुंबड उडत आहे. म्हणूनच शासनाने दुकानदारांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, हातमौजे आदी साहित्य उपलब्ध करून द्यावे. असे या निवेदनात म्हटले आहे. केंद्र शासनाने घोषित केलेले मोफत तांदळाचे मार्जिन 4 सप्टेंबर 2017 च्या शासन निर्णयाप्रमाणे देय राहील, असे जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सर्व दुकानदारांनी तांदूळ वाटप केले असल्याने शासनाने घोषित केलेले कमिशन हे दुकानदारांना शालेय पोषण आहाराप्रमाणे रोख स्वरुपात मिळावे. धान्यवाटप करताना लक्षात आले की, लाभार्थ्यांच्या कार्डावरील व्यक्ती संख्या व ऑनलाईन व्यक्ती संख्या यात फरक दिसतो. परिणामी दुकानदार व लाभार्थी यांच्यात वादाचे प्रसंग घडतात. म्हणूनच लाभार्थ्यांच्या कार्डावरील ऑनलाईन व्यक्ती संख्या ही ई-सेवा केंद्रामार्फत कमी-जास्त करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करतेवेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष बाबू नारकर, सल्लागार राजीव पाटकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here