सिंधुदुर्ग जिल्हय़ातील एक हजार शाळा क्वारंटाईनसाठी वापरात

0
228

 

प्राथमिक, माध्यमिक शाळा नेमक्या कधी सुरू होणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मात्र, सद्यस्थितीत शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडे कोणत्याही सूचना प्राप्त नाहीत. जिल्हय़ातील जवळपास एक हजार शाळा क्वारंटाईनसाठी वापरात असल्याने 2020-21 हे शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरू होणार, याबाबत अद्यापही अनिश्चितताच असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

शाळा 15 जूनपासून सुरू होणार, ऑनलाईन शिक्षण सुरू होणार, अशा अनेक बातम्या गेले काही दिवस चर्चेत आहेत. मात्र, अद्याप शिक्षण विभागाकडे असे कोणतेही आदेश प्राप्त नाहीत. किंबहुना शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नही नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हय़ातील शाळांच्या संख्येचा विचार केल्यास एक हजारच्या जवळपास शाळा चाकरमान्यांसाठी क्वारंटाईन कक्ष म्हणून वापरण्यात येत आहेत. या शाळांमध्ये आजही चाकरमानी आहेत. चाकरमान्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

अशा परिस्थितीत शाळा सुरू करता येणे अशक्य असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ऑनलाईन शिक्षणाचा पर्यायही सिंधुदुर्गमध्ये यशस्वीतेची शक्यता कमी असल्याने तूर्ततरी शाळा सुरू करण्याबाबतचे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here