सिंधुदुर्गात पुन्हा पावसाचा इशारा; 11,12 ला पावसाची शक्यता

0
143

 

सिंधुदुर्ग – अवघ्या दोन दिवसापूर्वी येथील तालुक्‍यासह अन्य तालुक्‍यात मोठ्या गडगडाटासह पाऊस झाला होता. एक दिवसाच्या निरभ्र वातावरणानंतर आता पुन्हा हवामान खात्याने सिंधुदुर्गात 11 व 12 ला काही ठिकाणी तसेच गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

त्यामुळे बागायतदार पुन्हा एकदा धास्तावले आहेत. आज सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण झाल्याने नागरिकांना उकाडा जाणवला. जिल्ह्यात अलीकडे बरेच वातावरणीय बदल पाहावयास मिळाले. उशिराने थंडी आली तरी फेब्रुवारीमध्येच तापमान वाढिला सुरुवात झाली होती.

जिल्ह्यात यंदा उच्चांकी तापमान नोंदविले गेले होते; मात्र तापमान वाढीची एकीकडे जिल्ह्याला झळ सोसावी लागली असतानाच अचानक पावसाने हजेरी लावत सर्वांचीच दाणादाण उडवली. आंबोली मध्ये वळीवाचा पाऊस कोसळला. यासह जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्लेचा काही भाग, सावंतवाडी परिसर भाग वैभववाडी कणकवली येथे कमी व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. बांदा परिसरात सर पावसाने जोरदार हजेरी लावली.
या पावसामुळे बागायतदारांचे तोंडचे मात्र पाणी पळाले. काजू व आंबा बागायतीचा अंतिम टप्प्यातील हंगाम सुरू आहे.

अद्यापही काही ठिकाणी आंबा व काजू परिपक्व न झाल्याने ही फळे झाडावर लगडली आहेत. अशा परिस्थितीत अचानक लावलेली पावसाने हजेरी ही बागायतदारांसाठी मात्र डोकेदुखी ठरली. त्यानंतर पुन्हा पाऊस होणार अशी तिळमात्र कल्पना नसताना अवघ्या दोन दिवसातच हवामान खात्याने जिल्ह्यात तुरळक व मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे सुचित केले आहे.

यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकांतून घामाच्या धारा वाहत आहेत. त्यामुळे अंगाची लाही लाही होत असलेल्या नागरिकांना मात्र हा पाऊस अधून मधून गारवा देणारा ठरत आहे. जिल्ह्यातील आंबा व्यापारी आंबा कॅनिंग तसेच परराज्यात परजिल्ह्यात निर्यात करण्यासाठी त्या कामात बरेच व्यस्त असलेले दिसून येत आहेत असे असताना आकाशात निर्माण होत असलेले पावसाचे ढग शेतकऱ्यांसाठी मात्र डोकेदुखीच बनले आहेत. आज सायंकाळी पाचनंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून आले. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here