सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल साकारणार असून येथील पोलीस परेड मैदाना जवळील 18 गुंठे जागेची विविध खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. जागा निश्चित करून नंतर आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी अनिल आवटी, राजन चव्हाण आदी उपस्थित होते.
तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे जाहीर करून त्याचे भूमिपूजनही केले होते. मात्र, जागेचा प्रश्न सुटला नव्हता. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी पोलीस परेड मैदानालगतची 18 गुंठे जागा योग्य असल्याचे सूचविले. त्याचा आराखडा सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पोलीस परेड मैदानाजवळील जागेची पाहणी करण्यात आली. पोलिसांच्या सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्राच्या जागेसह मैदान व वसाहतीजवळील जागेची या पथकाने पाहणी केली. लवकरच जागा निश्चित केली जाईल व रुग्णालयाचा आराखडा तयार केला जाईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देसाई यांनी स्पष्ट केले.