सिंधुदुर्ग – राज्यात कोरोनामुळे एक लाख तीस हजार लोकांचा मृत्यू झाला. त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांना त्याचं गांभीर्य नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाही. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.
सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना राणे यांनी सरकारवर अनेक आरोप केले, लोकसभेचं अधिवेशन हे 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत होणार आहे. महाराष्ट्रात मात्र फक्त दोनच दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं आहे. हे राज्याचं अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे, अशी टीका राणेंनी केली.
महाराष्ट्रातले जटील प्रश्न आहेत. गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. ते मात्र पळून गेले. त्यांना कोणतंही गांभीर्य नाही. त्यामुळेच दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे. एका बाजुला स्वत:ला वाघ म्हणवून घ्यायचं आणि दुसरीकडे कोल्ह्यासारखा पळ काढायचा, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही म्हणून अधिवेशनात ठराव करता मग मोदींशी 50 मिनिटं कसली चर्चा करत होता? आपल्या घरातील सदस्यांवर, पक्षातील नेत्यांवर कारवाई करू नका म्हणून ही चर्चा होती का? असा सवाल त्यांनी केला. हे सरकार फक्त आदित्य ठाकरेंसाठी चाललं आहे. आदित्य सांगेल त्याच फायलीवर मुख्यमंत्री सही करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.