मालवणचा देव रामेश्वर व शिवराय ऐतिहासिक भेट सोहळा दिमाखात देव रामेश्वराकडून शिवरायांना जिरेटोप प्रदान : हजारो भाविकांची उपस्थिती

0
155

 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी दिमाखात साजरा झाला. यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपले वारेसुत्र, तरंग व रयतेसह किल्ले सिंधुदुर्ग येथे रवाना होताना या ऐतिहासिक देदीप्यमान भेट सोहळय़ात हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार बनण्याचा सन्मान मिळविला.

दर तीन वर्षांनी देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी येत असतात. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ढोलताशांच्या गजरात रामेश्वराची पालखी भेट सोहळय़ासाठी आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह बाहेर पडली. वाटेत ओझर, कोळंब, धुरीवाडा येथे ग्रामस्थांनी मोठय़ा उत्साहात रामेश्वराचे स्वागत केले. कोळंब पूल येथे मालवण व्यापारी संघातर्फे आणि समस्त व्यापारी बांधवांनी रामेश्वराचे स्वागत करत बंदर जेटीपर्यंत पालखीला साथ केली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून रामेश्वराला अभिवादन करण्यात आले. किल्ला होडी सेवा संघटनेतर्फे ऐतिहासिक भेट सोहळय़ात सहभागी भाविकांना सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोफत नेण्यात आले. यात वारेसूत्र आणि तरंग यांना तर कार्यकर्त्यांनी उचलून समुद्रातून किल्ल्यावर नेऊन सोडले.

मालवणच्या हद्दीवरून म्हणजे मालवण-कोळंब या पुलावरून स्वागताने रामेश्वराला जोशी परिवार रितीरिवाजाप्रमाणे जोशीवाडा महापुरुष येथे घेऊन येतात. रामेश्वराची, सोबत असणाऱया इतर देवतांची वारेसूत्र, तरंग व रयतेसह सर्वांना गूळ पाणी देऊन सेवाचाकरी करतात. त्यानंतर जोशी परिवाराकडून रामेश्वराला सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत सुखरुप पोहोचविले जाते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर देव रामेश्वराला त्याच होडीने दांडी येथे सुखरुप पोहोचविण्यात येते, अशी प्रथा आहे. या प्रमाणेच जोशी परिवारातील नवीन पिढी ही रुढी-परंपरा त्याच पद्धतीने पूर्ण करत आहे. यासाठी जोशीवडा बाळगोपाळ मित्रमंडळ सिंधुदुर्ग किल्ला वेल्फेअर असोसिएशन, मालवण, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, रामचंद्र महादेव आचरेकर यांचेही मोठे सहकार्य लाभले.

या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळय़ासाठी कांदळगावातील सर्व मानकरी, ग्रामस्थ आणि तालुक्यातील भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. देव रामेश्वर जात असलेल्या मार्गावर ठिकठिकाणी सडारांगोळी, तोरणे, स्वागत कमानी, आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. रामेश्वर व परिसर देवालये विश्वस्त मंडळातर्फे भाविकांचे स्वागत करताना दिसून येत होती. सायंकाळी दांडेश्वर मंदिर (दांडी) येथे भेट, रात्री मौनीनाथ मंदिर (मेढा) येथे भेट व मुक्काम करण्यात आला.

नजराणा देऊन रंगला भेट सोहळा

देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावरील प्रमुख मानकरी सकपाळ कुटुंबियांनी स्वागत केले. त्यानंतर छत्रपतींकडून शेले-पागोटे देऊन देव रामेश्वराला नजराणा दिला गेला. सर्व वारेसुत्रांचाही सन्मान करण्यात आला. रामेश्वराकडून छत्रपतींना जिरे टोप व वस्त्रालंकार देऊन सन्मानित करण्यात आले. हा क्षण आपल्या डोळय़ात साठवून ठेवण्यासाठी अनेक भाविकांनी छत्रपतींच्या मंदिरात गर्दी केली होती. नंतर रामेश्वराने आपल्या वारेसुत्रांसह भवानी मातेसह किल्ल्यातील सर्व मंदिरांना भेट देऊन शुभाशीर्वाद आदान-प्रदान सोहळा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here