पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे निधन

0
119

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित, बहुभाषा कोविद आणि गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे अल्पशा आजाराने आज पणजी येथे निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर पणजीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्द्ल भारत सरकारने २००९ साली पद्मश्री किताबाने सन्मानित केले होते. शिक्षणतज्ञ, अनुवादक आणि भाषा चळवळीतील अग्रणी म्हणून ख्यातकिर्द असलेल्या अत्यंत विजिगीषू वृत्तीच्या आमोणकर यांनी आपल्या उत्तर आयुष्यामध्ये तब्बल चार वेळा कर्करोगासोबत यशस्वी लढा दिला होता. धम्मपद या बौद्ध धर्मीयांच्या धर्मग्रंथाचे कोकणीत संवाद करण्यासाठी त्यांनी पाली भाषा शिकली होती त्याच प्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, गोस्पेल ऑफ जॉन या महत्त्वाच्या धार्मिक पुस्तकांचे ही केलेले प्रवाही आणि प्रभावी कोंकणी अनुवाद वाचकांमध्ये प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी शेक्सपियरच्या निवडक नाटकांचे कोंकणी अनुवाद करायला सुरू केली होती. त्याची सुरुवात म्हणून शेक्सपियरच्या विविध नाटकातील प्रसिद्ध संवाद, म्हणी यांचे संकलन करून कोंकणी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केले होते. वर्षभरापुर्वीच त्यांची गोवा कोंकणी अकादेमीच्या अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आली होती. साहित्य अकादमी आणि पद्मश्री पुरस्कारासह त्यांना ज्ञानपीठकार रवींद्र केळकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here