सिंधुदुर्ग – ओरोस येथील सिद्धी पेट्रोलपंपावर आज पहाटे साडे सहा वाजता दरोडा घालून 57 हजारांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या अवघ्या अडीच तासांत मुसक्या आवळण्यात एसपी दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व त्यांच्या टीम ला यश आले आहे. या दरोड्यात एकूण 5 आरोपीना अटक करण्यात आली असून दरोड्यातील 57 हजार रोख रक्कमेसह गोव्यात चोरलेले महागडे 29 मोबाईल ही दरोडेखोरांकडून जप्त करण्यात आले आहेत.
तसेच दरोड्यात वापरलेली सॅनट्रो कारही जप्त केली आहे. दरोड्यातील रोख रक्कम 57 हजार सह मोबाईल व कार मिळून सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दरोड्याच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करत अलर्ट चा आदेश दिला होता. त्यानुसार वैभववाडी पोलीस निरिक्षक अतुल जाधव हे स्वतः सहकारी पोलिसांसह तात्काळ करूळ चेकपोस्ट वर दाखल होत प्रत्येक वाहनाची कसून झडती घेत होते.
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दरोड्यातील संशयित कार ( MH -04 – KF – 2748 ) वैभववाडीत संभाजी चौकात आली असता न थांबता सुसाट कोल्हापूर च्या दिशेने पळाली. मात्र वैभववाडी पोलिसांनी शिताफीने थरारक पाठलाग करत पीआय अतुल जाधव व त्यांच्या सहकारी पोलिसांनी कारला करूळ चेकपोस्ट येथे गाठत लागलीच कारमधील पाचही दरोडेखोरांवर झडप घालत त्यांच्या मुसक्या आवळल्या. अब्दुल रजाक, मीर बादशहा शेख, सोहेल युनूस काझी, प्रमोद प्रकाश गायकवाड, चालक राजेश गुणाजी मासवकर अशी पाचही आरोपींची नावे आहेत.हे पाचही आरोपी घाटकोपर हुन भाड्याच्या कारने 31 डिसेंबर ला गोव्याला गेले होते.
गोव्यात गर्दीचा फायदा घेत त्यांनी तब्बल 29 मोबाईल हातोहात लांबवले. ओरोसला सिद्धी पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने आले.पेट्रोल पंपाच्या मॅनेजरने ठेवलेली हिशोबाची 57 हजार रोकड अब्दुल रजाक याने लंपास केली आणि कारसहन सर्वांनी पोबारा केला. दरोड्याची घटना पोलिसांना समजताच एसपी दाभाडे यांनी लागलीच जिल्ह्यात नाकाबंदी केली. आणि दरोड्या च्या घटनेनंतर अवघ्या अडीच तासांत दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.